Paddy Crop Loss: ‘इंद्रायणी’ तांदूळ भाव खाणार? भोर तालुक्यात निसर्गाचा दुहेरी घाला; पावसाची दांडी अन् भातशेती संकटात
Paddy Crop Loss: जुलै महिन्यातील अतिवृष्टीनंतर आता पावसाचा ३ ते ४ आठवड्यांचा मोठा खंड; भोर व राजगड (वेल्हा) तालुक्यातील भातशेती सुकू लागल्याने शेतकरी चिंताक्रांत.

Paddy Crop Loss- पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेला मुसळधार पाऊस आणि आता पावसाने मारलेली दडी अशा दुहेरी संकटात भोर तालुक्यातील भातशेती सापडली आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धातही पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने भात पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. परिणामी यंदा भात उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, बाजारात इंद्रायणी तांदुळ भाव खाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पुणे जिल्ह्यातील कृषी विभागाच्या ताज्या माहितीनुसार,
भोर आणि वेल्हा तालुक्यात ३ ते ४ आठवड्यांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. पावसातील हा प्रदीर्घ खंड खरीप पिकांसाठी चिंताजनक मानला जात आहे. शासनानेही यंदाच्या खरीप हंगामातील परिस्थितीची दखल घेत भोर आणि राजगडसह पुणे जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. यंदाच्या हंगामात भोरच्या पश्चिम भागात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने भात रोपे आणि भातखाचरांचे मोठे नुकसान झाले.
कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार ४४३ शेतकऱ्यांच्या १२३. ३८ हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले होते. आता परिस्थिती उलटी झाली आहे. अतिवृष्टीच्या धक्क्यातून सावरण्याआधीच पावसाने पुन्हा मोठी उघडीप दिल्याने भात पिकाला आवश्यक पाण्याचा पुरवठा धोक्यात आला आहे. भोर-राजगड तालुक्यातील डोंगराळ, माळरान आणि पावसावर अवलंबून असलेल्या भागातील माळाची भातशेती पावसाच्या खंडामुळे अधिक धोक्यात आली आहे.
भोरमध्ये ७, ५००; राजगडमध्ये ५, ०२५ हेक्टर भात
भात हे भोर-राजगड तालुक्यातील मुख्य खरीप पीक आहे. उपलब्ध कृषी विभागीय आकडेवारीनुसार भोर तालुक्यात सुमारे ७, ५०० हेक्टर तर वेल्हा तालुक्यात सुमारे ५, ०२५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होते. २०२६ च्या हंगामात भात लागवडीसाठी भोरमध्ये सुमारे ७३० हेक्टर, तर राजगडमध्ये सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यात आली होती.
‘इंद्रायणी’ भाव खाणार?
इंद्रायणीला बाजारात मोठी मागणी असून हा वाण मोठ्या प्रमाणावर भोर-राजगडमध्ये घेतला जातो. मागील हंगामात भोर तालुक्यात सुमारे ७, ६१० हेक्टरवर भात लागवड झाली होती आणि सरासरी उत्पादन सुमारे ४, ४८० किलो प्रति हेक्टर नोंदवले गेले होते. इंद्रायणी तांदळाला दर्जानुसार 60 ते 70 रुपये बाजारभाव मिळत असल्याची नोंदही आहे. यंदा मात्र पावसाच्या खंडामुळे उत्पादनात घट झाली तर बाजारात आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंद्रायणीच्या दरावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी आणि व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.






