Sangram Thopte: “अडचणी कितीही येऊ द्या, नवीन कारखाना उभारणारच!”; राजगडच्या सभेत संग्राम थोपटेंचा निर्धार
Sangram Thopte: अनंतनगर-निगडे येथे राजगड कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; संस्थापक अनंतराव थोपटे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन.

Sangram Thopte- राजगड कारखान्याच्या आर्थिक कोंडीमुळे २०२३-२०२४ ते २०२५-२०२६ हे सलग तीन गळीत हंगाम बंद राहिले; तरीही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहू दिला नाही. आगामी २०२६-२०२७ चा चालू गळीत हंगामही सुरू होणे कठीण आहे. मात्र, शासनाने थकहमी देऊन कर्ज व निधी उपलब्ध करून दिल्यास ३५०० मे. टन क्षमतेचा अत्याधुनिक नवीन साखर कारखाना आणि उपपदार्थ प्रकल्प निश्चितपणे उभा करू.
संस्थापक माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे स्वप्न व शेतकरी-कामगारांचे हित जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. राजगड सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. २८) अनंतनगर-निगडे (ता. भोर) येथील कारखाना स्थळावर पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
सभेला कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट सुके, संचालक उत्तम थोपटे, किसन सोनवणे, शोभा जाधव, सुरेखा निगडे, शिवाजी कोंडे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, विकास कोंडे, अशोक शेलार, तसेच संदीप निगडे, विजय गरुड, बाळासाहेब गरुड, आबासाहेब यादव यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध होणार असून प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती थोपटे यांनी दिली. सभेचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक सर्जेराव पाटील यांनी केले, सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी केले, तर आभार संचालक शिवाजी कोंढाळकर यांनी मानले.
अत्याधुनिक नवीन प्रकल्प व विस्तार योजना
सध्याची १२५० मे. टन दैनंदिन गाळप क्षमता वाढवून ३५०० मे. टन क्षमतेचा नवीन अत्याधुनिक कारखाना उभारण्याचे नियोजन आहे. या कर्जाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने २६ ऑगस्ट २०२५ रोजी शासकीय थकहमी दिली आहे. १२ मेगावॅट क्षमतेचा को-जनरेशन (सह-वीज निर्मिती) प्रकल्प उभारणार. ६० के.एल.पी.डी. क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प आणि ५ मे. टन क्षमतेचा सी.बी.जी. गॅस प्रकल्प उभारणीचा डीपीआर शासनास सादर केला असून त्यास मंजुरी मिळाली आहे.






