Ozar News : श्री विघ्नहरांच्या जन्मोत्सवासाठी ओझर नगरी सज्ज; १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Ozar News : अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतींच्या भव्य जन्मोत्सव सोहळ्यासाठी संपूर्ण ओझर नगरी सज्ज झाली आहे.

Ozar News : अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतींच्या भव्य जन्मोत्सव सोहळ्यासाठी संपूर्ण ओझर नगरी सज्ज झाली आहे. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने यंदाचा जन्मोत्सव १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. (Ozar News)
महान साधू श्री मोरया गोसावी यांच्या सांप्रदायिक परंपरेनुसार होणाऱ्या या जन्मोत्सवात धार्मिक विधी, पालखी सोहळा, कीर्तन, छबीना, भजन-जागर, अन्नप्रसाद तसेच पारंपरिक कुस्त्यांचा जंगी आखाडा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. द्वार यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांना अन्नदान माझी विद्यार्थी संघटना श्री क्षेत्र ओझर यासकडून करण्यात येणार आहे. (Ozar News)
जन्मोत्सवाच्या निमित्ताने ओझरच्या चारही द्वारांवर विशेष पूजा करण्यात येणार आहे. पूर्वद्वार उंब्रज येथे लक्ष्मी-नारायण पूजा, दक्षिणद्वार धनेगाव (धनगरवाडी) येथे उमा-महेश पूजा, पश्चिमद्वार शिरोली खुर्द येथे रती-कंदर्प पूजा, तर उत्तरद्वार अंबेराई ओझर (जगदाळे मळा) येथे पृथ्वी व सूर्य पूजा होणार आहे. (Ozar News)
सोमवार १४ सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत ह.भ.प. शिवचरित्रकार देवगिरी महाराज कोपरगावकर यांचे गणेश जन्माचे कीर्तन होणार असून, दुपारी १२.३० वाजता श्रींचा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. त्यानंतर सामुदायिक शेरण्या व दंडवते, सायंकाळी कीर्तन, छबीना व विविध भजन मंडळांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. (Ozar News)
मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी पालखी मिरवणूक सांगता सोहळा होणार असून, दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत लाल मातीवरील भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे. तसेच रात्री ९ वाजता निर्माते-दिग्दर्शक अशोक हांडे यांचा विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. (Ozar News)
जन्मोत्सव काळात दररोज दुपारी अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री धुपारती, मोरया गोसावी यांची पदे, छबीला, भजन व जागराचे कार्यक्रम होणार आहेत. (Ozar News)
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांनी ही माहिती दिली. श्रींच्या जन्मोत्सवाच्या या मंगल पर्वानिमित्त संपूर्ण ओझर नगरीत भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी मंदिर परिसर व ग्रामस्थ मंडळी सज्ज झाली आहेत. (Ozar News)
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री विघ्नहरांच्या जन्मोत्सवाचा आनंद व श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे. (Ozar News)





