Organ Donation Pune: अवयवदानात पुणे विभागाचा डंका! ५ वर्षांत ४०० दात्यांमुळे तब्बल ८९६ रुग्णांना मिळाले जीवनदान
Organ Donation Pune: सरकारी रुग्णालयांचा पुढाकार; ससून आणि कमांड हॉस्पिटलमुळे अवयवदानाची मोहीम तळागाळापर्यंत पोहोचली.

Organ Donation Pune – अवयवदानाच्या चळवळीत पुणे विभागाचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून, मागील पाच वर्षात तब्बल ४०० मरणोत्तर दात्यांमुळे ८९६ रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. २०२१ च्या तुलनेत २०२५ मध्ये अवयवदानात ८० टक्क्यांनी वाढ झाली असून, २०२६ मध्ये अवघ्या सात महिन्यांतच ४४ दात्यांची नोंद झाल्याने चालू वर्षाचा आलेख वाढत असून, वाढत्या जागरूकतेमुळे अवयवदानाची ही चळवळ अधिक मजबूत होत आहे.
अवयवदान चळवळीत झेडटीसीसीचे योगदान मोठे असून, रुग्णालय समुपदेशक आणि विविध संस्थांच्या प्रयत्नांमुळे ही चळवळ मजबूत होत आहे. तरीही, प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकांची संमती काळाची गरज आहे. गेल्या दशकभरात पुण्याचा आलेख सातत्याने बदलला आहे. २०१७ मधील ५७ दात्यांवरून २०१८-१९ मध्ये हा आकडा ६३ वर पोहोचला.
कोरोनाकाळात घसरण झाली असली, तरी २०२२ पासून ही संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गतवर्षी (२०२५) तब्बल ७९ दात्यांमुळे २०७ अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण झाले, जो आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम आहे. यंदा अवघ्या सात महिन्यांतच ४४ दात्यांकडून ११५ प्रत्यारोपणे झाली असून, वर्षाअखेरीस हा आकडा शंभरी गाठेल अशी आशा आहे. विशेष म्हणजे, पूर्वी केवळ मोठ्या खासगी रुग्णालयांपुरती मर्यादित असणारी ही चळवळ आता ससून आणि कमांड हॉस्पिटलसारख्या सरकारी संस्थांमुळे तळागाळापर्यंत पोहोचली आहे.
पुणे विभागात अवयवदान वाढत असले, तरी आजही २ हजार ९४६ रुग्ण प्रतीक्षा यादीत जीवन-मरणाची लढाई लढत आहेत. यामध्ये सर्वाधिक २ हजार रुग्ण एकट्या किडनीच्या प्रतीक्षेत असून, ८०० रुग्ण यकृत, ६८ मल्टिव्हिसरल, ५६ हृदय आणि २२ रुग्ण फुफ्फुसांच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या साडेपाच वर्षांतील एकूण प्रत्यारोपणात सर्वाधिक ६२.७ टक्के वाटा (५६२ प्रत्यारोपणे) किडनीचा आहे.





