Rohit Sharma Post : ‘सिडनीला शेवटचा निरोप…’, रोहित शर्माची इमोशनल पोस्ट व्हायरल झाल्याने चाहते भावूक

Rohit Sharma Emotional Post Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका नुकतीच संपली. या मालिकेत भारतीय संघाला 1-2 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला असला, तरी कर्णधार रोहित शर्माने आपल्या दमदार कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली. विशेषत: तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने नाबाद शतक झळकावत भारताला 9 गडी राखून विजय मिळवून दिला आणि आपल्या टीकाकारांना सणसणीत उत्तर दिले. या मालिकेतील अप्रतिम प्रदर्शनामुळे रोहितला ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर त्याने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.
रोहितचा भावनिक संदेश –
सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 121 धावांची नाबाद खेळी साकारली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतील पराभवानंतर हा विजय भारतीय संघासाठी मोठा दिलासा ठरला. सामन्यानंतर रोहितने आपल्या ‘एक्स’ खात्यावर “एकदा शेवटच्या वेळेस सिडनीमधून निरोप घेताना”, असा भावनिक संदेश शेअर केला. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली, कारण काहींनी याचा संबंध त्याच्या निवृत्तीशी जोडला. मात्र, ही पोस्ट केवळ सिडनी मैदानाशी असलेल्या भावनिक नात्याचा आविष्कार आहे, निवृत्तीच्या योजनेशी नाही.
One last time, signing off from Sydney 👊 pic.twitter.com/Tp4ILDfqJm
— Rohit Sharma (@ImRo45) October 26, 2025
रोहित शर्माचा मोठा पराक्रम –
तिसऱ्या वनडेतील शतकासह रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके पूर्ण केली. या मालिकेतील त्याच्या कामगिरीने त्याने आपली फलंदाजी किती उंचीवर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. त्याने आतापर्यंत कसोटीत क्रिकेटमध्ये 12 शतकं, वनडेत 33 शतकं आणि टी-20 मध्ये पाच शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा – Ellyse Perry : एलिस पेरीने मोडला मिताली राजचा विश्वविक्रम, ऑस्ट्रेलियासाठी केला खास पराक्रम
ऑस्ट्रेलियातील वनडे शतकांचा विक्रम –
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात सर्वाधिक वनडे शतकं ठोकणारा परदेशी फलंदाज ठरला आहे. त्याने वनडेतील 33 डावात ६ शतकं झळकावली आहेत. तसेच विराट कोहलीने 32 डावात 5 शतकं आणि कुमारा संगकाराने 5 शतकं (49 डाव) झळकावली आहेत.
प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक वनडे शतकं:
- विराट कोहली: 10 (श्रीलंका विरुद्ध)
- विराट कोहली: 9 (वेस्ट इंडीज विरुद्ध)
- सचिन तेंडुलकर: 9 (ऑस्ट्रेलिया विरुद्ध)
- रोहित शर्मा: 9 (ऑस्ट्रेलिया विरुद्ध)
हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माचा कहर! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत सुनील गावस्करांना टाकलं मागे
वर्ल्ड कप 2027 ची तयारी –
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी या मालिकेतील आपल्या शानदार प्रदर्शनाने सिद्ध केले की, त्यांचे लक्ष्य 2027 च्या वनडे विश्वचषकावर आहे. रोहितचा फॉर्म आणि आत्मविश्वास हे दर्शवितो की, तो आणखी बराच काळ भारतीय क्रिकेटला आपली सेवा देत राहील. चाहत्यांचीही इच्छा आहे की, रोहित आणि विराट 2027 च्या विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करावे. रोहित शर्माच्या या दमदार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.





