Ellyse Perry : एलिस पेरीने मोडला मिताली राजचा विश्वविक्रम, ऑस्ट्रेलियासाठी केला खास पराक्रम

एलिस पेरीने मोडला मिताली राजचा विश्वविक्रम –
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाने ऑस्ट्रेलियासाठी खास महत्त्व आहे, कारण या सामन्यासह एलिस पेरी महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारी खेळाडू बनली आहे. पेरीने आतापर्यंत 130 एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर मिताली राजने आपल्या कारकिर्दीत 129 सामने जिंकले होते. अशा प्रकारे पेरीने मितालीला मागे टाकत नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
एलिस पेरी ही महिला क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानली जाते. तिने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 164 एकदिवसीय सामने खेळले असून, त्यापैकी 130 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. या काळात तिने 4427 धावा केल्या, ज्यात 3 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही ती संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तिने 168 सामन्यांमध्ये 2173 धावा केल्या असून, अनेकदा संघाला अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढले आहे.
हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माचा कहर! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत सुनील गावस्करांना टाकलं मागे
लीग टप्प्यात ऑस्ट्रेलियाची अपराजित कामगिरी –
महिला विश्वचषक 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाची आतापर्यंतची कामगिरी सर्वात स्थिर आणि संतुलित ठरली आहे. लीग टप्प्यात त्यांनी एकूण 7 सामने खेळले, त्यापैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर एक सामना अनिर्णित राहिला. यासह 13 गुणांसह ऑस्ट्रेलियाने गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावत सेमीफायनलमध्ये धडक मारणारा पहिला संघ ठरला.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘मै पागल नही हूं, मुझे पता है…’, दमदार शतक झळकावल्यानंतर हिटमॅनचा ‘तो’ VIDEO व्हायरल
उपांत्य फेरीत भारताशी होणार लढत –
आता ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत भारतीय संघाशी भिडणार आहे. हा सामना अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. चाहत्यांचे लक्ष आता एलिस पेरी आणि तिच्या संघावर केंद्रित आहे, जो विश्वचषकाच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.





