पाथर्डी – सीमकार्डसाठी लागणारे आधारकार्ड बनावट तयार करून आयडिया व जिओ कंपनीचे सीमकार्ड विक्री करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने विक्री केलेल्या बनावट सीमकार्डचा उपयोग कशासाठी केला आहे याचा पोलीस तपास करीत आहे. आरोपी भागवत बनसोडे याला अटक केली आहे.
सायबर विभागाकडून माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक संतोष मुटुकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप बडे, सुहास बटुळे, भगवान गरगडे यांनी पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील दत्त जनरल स्टोअर्स येथे छापा घातला असता तेथून बनावट आधार कार्ड वापरून शेकडो सीमकार्ड विशिष्ट लोकांना विक्री करण्यात आल्याचे समोर आल्याने आरोपी भागवत साहेबराव बनसोडे (रा. भालगाव, ता. पाथर्डी) याची अधिक माहिती घेतली असता आरोपीचे प्रत्यक्षात दुकान नसून तो राहत्या घरातून आयडिया व जिओ कंपनीचे सीमकार्ड विक्री करणारा डीलर असल्याचे समोर आले.
आरोपीने विक्री केलेल्या सीमकार्डच्या कागदपत्रांचे रजिस्टर, ओळखपत्र याबाबत विचारणा केली असता आरोपी बनसोडे याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचे घराची झडती घेतली असता त्याने विक्री करता आणलेले हजारो सीमकार्ड, तसेच स्कॅनिंगसाठीचे पॉज मशीन, मोबाईल संच आदी मुद्देमाल आढळून आला. बनावट ओळखपत्राच्या माध्यमातून सीमकार्ड विक्री केले गेले आहेत. त्या सीमकार्डचा उपयोग देशविघातक कामात केला जातो का याचाही पोलीस आता कसून शोध घेत आहे. आरोपी बनसोडे याने बनावट ग्राहकांचे छायाचित्र वापरून, बनावट आधार कार्ड तयार करून अनेक सीमकार्ड वितरित केल्याची तांत्रिक माहिती मिळाल्यावरून आरोपी बनसोडे याच्याविरुद्ध बनावट दस्तावेज बनवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.