Newasa : नेवासा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा वृद्ध महिलेच्या तोंडाला चावा
Newasa : : नेवासा शहरातील कोर्ट गल्ली येथे पिसाळलेल्या कुत्र्याने वृद्ध महिलेच्या तोंडाला चावा घेतला. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Newasa : नेवासा शहरातील कोर्ट गल्ली येथे पिसाळलेल्या कुत्र्याने वृद्ध महिलेवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि. ९) दुपारी चारच्या सुमारास घडली. कुत्र्याने महिलेच्या तोंडाला चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोफिया निजाम पठाण असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या घराजवळून जात असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्याने त्यांच्या तोंडाला चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
हल्ल्यानंतर हे कुत्रे कडू गल्ली परिसरातील चार जणांच्या मागे लागले होते. या नागरिकांनी कसाबसा आपला जीव वाचवला. त्यानंतर कुत्र्याने मोहनराज गल्लीतील मंदिराच्या दिशेने धाव घेतली. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच लहान मुलांनी आणि नागरिकांनी रस्त्यावरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.





