NZ vs SA Final : शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडने मारली बाजी, दक्षिण आफ्रिकेला ३ धावांनी हरवून ट्रॉफीवर कोरलं नाव

NZ vs SA New Zealand clinched the T20 tri-series title : न्यूझीलंडने शनिवारी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला तीन धावांनी नमवत ट्रॉफी जिंकली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना कॉनवे आणि रवींद्र यांच्या शानदार खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या चेंडूपर्यंत लढा दिला, परंतु प्रीटोरियसच्या अर्धशतकानंतरही त्यांना तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला. १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून १७७ धावाच करू शकला.
प्रीटोरियस आणि हेंड्रिक्सने साकारली ९२ धावांची भागीदारी –
झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील या मालिकेत न्यूझीलंडने एकही सामना न गमावता अंतिम सामना जिंकून विजेतेपद पटकावले. १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर लुआन-द्रे प्रीटोरियस आणि रीझा हेंड्रिक्स यांनी पहिल्या गड्यासाठी ९२ धावांची भागीदारी केली. १०व्या षटकात मायकेल ब्रेसवेलने लुआन-द्रे प्रीटोरियसला (५१) टिम सीफर्टच्या हातून बाद करत न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. प्रीटोरियसने ३५ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकार मारले.
Five wins on the trot to claim the T20I Tri-Series trophy 🏆 #SAvNZ #CricketNation 📷 = Zimbabwe Cricket pic.twitter.com/p6cXmqlgJ0
— BLACKCAPS (@BLACKCAPS) July 26, 2025
१३व्या षटकात झॅकरी फॉक्सने रीझा हेंड्रिक्सला (३७) बाद केले. हेंड्रिक्सने ३१ चेंडूत चार षटकार ठोकले. १५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार रॅसी व्हॅन डर डुसेन (१८) याला अॅडम मिल्नेने बाद केले. पुढच्याच षटकात जेकब डफीने रुबिन हर्मन (११) याला बाद करत दक्षिण आफ्रिकेच्या आशांना धक्का दिला. शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मॅट हेन्रीने डेवाल्ड ब्रेव्हिसला (३१) बाद केले आणि सामना पुन्हा न्यूझीलंडच्या बाजूने झुकवला. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर हेन्रीने जॉर्ज लिंडे (१०) याला बाद करत सामन्याला आणखी रंगत आणली.
हेही वाचा – Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तानला एकाच गटात मिळालं स्थान
शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडचा विजय –
शेवटच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला चार धावांची गरज होती, पण हेन्रीने तो चेंडू निर्धाव टाकत न्यूझीलंडला तीन धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिका संघ २० षटकांत ६ गडी गमावून १७७ धावाच करू शकला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने १९ धावांत दोन गडी बाद केले, तर जेकब डफी, झॅकरी फॉक्स, अॅडम मिल्ने आणि मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याचबरोबर फलंदाजीत कॉनवे आणि रवींद्रने प्रत्येकी ४७-४७ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.





