NZ vs IND – न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाने भारतीय संघाचा खेळ खराब केला. आता टीम इंडियासाठी मालिकेतील परिस्थिती अधिक कठीण झाली आहे. हा सामना रद्द झाल्याने न्यूझीलंडचा संघ सध्या मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी आता मालिकाविजयाचे आव्हान संपले आहे, मात्र ही मालिका बरोबरीत संपवण्यासाठी शेवटचा ( NZ vs IND ) सामना जिंकणे गरजेचे आहे. दुसऱ्या सामन्यासाठी संजू सॅमसनचा संघात स्थान देण्यात आले नव्हते. यानंतर संघ व्यवस्थापन आणि कर्णधारावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, शिखर धवनने सॅमसनला संघात न खेळवण्याबाबत कारण सांगितले आहे.
धवन म्हणाला की, “आम्हाला दुसऱ्या ( NZ vs IND ) सामन्यासाठी सहाव्या गोलंदाजीचा पर्याय वापरायचा होता. त्यामुळेच सॅमसनला संघात स्थान देण्यात आले नाही. अष्टपैलू दीपक हुडाला गोलंदाजी पर्याय म्हणून आणल्याने सॅमसनला बाहेर बसवावे लागले. दीपक चहरलाही संघात स्थान दिले कारण त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याची कला आहे. आमचा संघ मजबूत असून संघामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली आहे.”
धवन पुढे म्हणाला की,”शुभमनच्या फलंदाजी आणि उमरानच्या गोलंदाजीतील बदल पाहून आनंद झाला. एक संघ म्हणून आम्हाला आमची रणनीती अंमलात आणायची आहे. क्राइस्टचर्च येथील मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात आम्ही चांगला खेळ करू. आम्ही सामना जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू आणि खेळाचा आनंद घेऊ.”
हॅमिल्टन येथील मालिकेच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला सुरुवात केली होती. मात्र सामान्याच्या १३व्या षटकात पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबवला. यानंतर पाऊसाने थांबण्याचे नाव न घेतल्याने अखेर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मोठा फटका भारतीय संघाला बसला आहे. टीम इंडिया या मालिकेत आधीच पिछाडीवर असल्याने हा सामना जिंकणे आवश्यक होते. मात्र आता तिसऱ्या सामन्यात भारताला ही मालिका बरोबरीत संपवण्याची संधी असणार आहे.