Sanju Samson Story : चेपॉकवरील हायव्होल्टेज राड्यानंतर संजू सॅमसनने सोडलं मौन; सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टने वेधलं जगाचं लक्ष!
Sanju Samson Story : चेपॉकमधील सामन्यादरम्यान झालेल्या जोरदार शाब्दिक चकमकीनंतर संजू सॅमसनची इन्स्टा स्टोरी व्हायरल होत आहे.

Sanju Samson Insta Story Viral : आयपीएल २०२६ मधील चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात मैदानावर निर्माण झालेला प्रचंड तणाव आता पूर्णपणे निवळला आहे. चेपॉक स्टेडियमवरील सामन्यात सीएसकेचा विकेटकीपर संजू सॅमसन आणि हैदराबादचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेन यांच्यात झालेली शाब्दिक चकमक आणि वाद आता संपला असून, या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी मैदानाबाहेर एकमेकांकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे.
मैदानात नेमकं काय घडलं होतं?
हैदराबादचा धोकादायक फलंदाज हेनरिक क्लासेन आपल्या आक्रमक फलंदाजीने सामना चेन्नईच्या हातातून हिरावून घेत होता. त्याच वेळी संजू सॅमसनने कमालीच्या चपळाईने क्लासेनला यष्टिचीत (स्टंप आउट) केले. क्लासेन बाद होताच मैदानावरील वातावरण तापले. स्टंपिंग पूर्ण केल्यानंतर संजू सॅमसन खेळपट्टीजवळ उभा राहून क्लासेनकडे रागाने पाहताना कॅमेऱ्यात कैद झाला. संजूचा हा अॅटिट्यूड दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाला अजिबात आवडला नाही. मैदानाबाहेर जाताना क्लासेनने मागे वळून संजूला तिखट शब्दात प्रत्युत्तर दिले आणि संतापाच्या भरात डगआऊटऐवजी तो थेट ड्रेसिंग रूममध्ये निघून गेला.
It took a brilliant stumping from Samson to get Klaasenpic.twitter.com/dJtfBM7oTP
— Werner (@Werries_) May 18, 2026
सॅमसनची इन्स्टाग्राम पोस्ट अन् क्लासेनचे उत्तर –
Instagram story of Sanju Samson and Heinrich Klassen for each other.❤️ pic.twitter.com/CihOrfHWDF
— Maina Singh (@Maina_Singhx77) May 20, 2026
हा वाद सोशल मीडियावर चर्चिला जाऊ लागल्यानंतर संजू सॅमसनने स्वतःहून पुढाकार घेतला. त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हेनरिक क्लासेनसोबत हसतानाचा एक फोटो शेअर केला. संजूने लिहिले, “मैदानावर बऱ्याच गोष्टी घडत असतात, पण या अप्रतिम माणसासाठी मैदानाबाहेर माझ्या मनात प्रचंड प्रेम आणि आदर आहे.” संजूच्या या खिलाडूवृत्तीचा क्लासेननेही मान राखला. संजूची स्टोरी री-शेयर करत क्लासेनने उत्तर दिले, “भावा, तुझ्यासाठी खूप प्रेम आणि आदर! मला तुझा खेळ नेहमीच आवडतो. आपल्यात सर्वकाही ठीक आहे आणि आता मैदानातील पुढच्या लढतीची प्रतीक्षा असेल.”
२०१८ मधील जुने सवंगडी!
क्रिकेट चाहत्यांसाठी ही अत्यंत रंजक गोष्ट आहे की, संजू आणि क्लासेन यांच्यातील नाते जुने आहे. २०१८ च्या आयपीएल हंगामात हे दोन्ही खेळाडू ‘राजस्थान रॉयल्स’ (RR) संघासाठी एकत्र खेळले होते. याच जुन्या मैत्रीमुळे त्यांनी मैदानावरील तो तात्पुरता राग आपल्या वैयक्तिक नात्यात येऊ दिला नाही, ज्याचे कौतुक सध्या क्रीडा विश्वात होत आहे.





