कराड -वनवासमाची (ता. कराड) येथील दहा वर्षांच्या मुलाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे वनवासमाचीतील बाधितांचा आकडा 12 झाला असून कराड तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या 32 वर पोहचली आहे. वनवासमाचीतील या आधी बाधित असलेल्या मुलाच्या संपर्कात आल्याने या दहा वर्षांच्या मुलास करोनाची लागण झाली आहे.
यापूर्वी वनवासमाचीतील दोन कुटुंबांमधील 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आता तिसऱ्या कुटुंबातील दहा वर्षांच्या मुलास लागण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये अधिक भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही मुलांचा खेळताना एकमेकांशी संपर्क आल्याची शक्यता वर्तवली जात असून, गावातील सर्वच मुलांची तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, वनवासमाचीतील करोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न तालुका आरोग्य विभाग करत असतानाही बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याबरोबर आरोग्य यंत्रणेवरील ताणही आणखी वाढला आहे. पहिल्या व दुसऱ्या कुटुंबातील बाधितांच्या संपर्कात आल्याने या दहा वर्षांच्या मुलाला कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मुलाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे.
कराड तालुक्यातील तीन रुग्णांनी करोनावर मात केल्याची दिलासा देणारी बातमी बुधवारी मिळाली होती. त्यामुळे करोनाची साखळी हळूहळू तुटेल, अशी आशा सर्वांना होती. परंतु, वनवासमाचीतील मुलास लागण झाल्याचे समजल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 16, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला असून आणखी 47 जणांना कृष्णा हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.