लंडन – कोविड पेशंटमध्ये एक विशिष्ट प्रकाराचा वास असतो. हा वास ओळखण्याची क्षमता प्रशिक्षित श्वानांमध्ये असते असा निष्कर्ष ब्रिटन मधील एका पहाणीतून आढळून आला आहे. हे प्रशिक्षित श्वान अत्यंत अचुकपणे कोविड रूग्ण ओळखू शकतात असेही या संशोधानातून पुढे आल्याने आता कोविड पेशंट ओळखण्यासाठी यापुढील काळात श्वानांचाहीं उपयोग होऊ शकतो असे सांगितले जात आहे.
लंडन मधील लंडन स्कुल ऑफ हायजिन ऍन्ड ट्रॉपिकल मेडिसीन या संस्थेने एका श्वान प्रशिक्षण संस्थेबरोबर सहकार्य करून या विषयावर संशोधन केले. त्यात हे आढळून आले आहे. या श्वानांनी 94.3 टक्के अचुकता दाखवत हे पेशंट नुसत्या वासावरून ओळखले आहेत.
कोविडचे असिम्टीमॅटिक पेशंटही त्यांनी शोधून काढले आहेत. कोविडचे नवनवीन व्हेरियंट आता निर्माण होऊ लागले आहेत प्रशिक्षित श्वानांना त्यातील फरकही ओळखता येऊ शकतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.
या कामासाठी यापुढील काळात श्वानांचा उपयोग करता येऊ शकेल काय यावर आता अधिक संशोधन केले जाणार आहे. जेथे लोक समुहाची मोठी गर्दी असते अशा ठिकाणी श्वानांची मदत घेऊन संबंधीत रूग्णाला शोधून काढणे आणि त्याला वेगळे ठेवणे सहज शक्य होऊ शकणार आहे.