नोंद : हयातीचा दाखला?
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्तीवेतन धारकांना आपले निवृत्तीवेतन (Pension) सुरू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. त्या संबंधी...

– अमेय गुप्ते
Pension : दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्तीवेतन धारकांना आपले निवृत्तीवेतन (Pension) सुरू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. त्या संबंधी…
.
निवृत्तीवेतन (Pension) हा सरकारी सेवानिवृत्त व्यक्तीचा निवृत्तीनंतरचा जणू एक आर्थिक स्वरूपाचा आधार असतो, असे म्हणणे उचित ठरेल. देशातील आणि राज्यातील लाखो निवृत्तीवेतन धारकांसाठी नोव्हेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा असून, आपले निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत आपला हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक असतो.
या प्रक्रियेसाठी पूर्वी वृद्धनिवृत्तीवेतन धारकांना बँकेच्या लांबच लांब रांगेत ताटकळत उभे राहावे लागायचे. परंतु, आता तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकांमध्ये बायोमॅट्रिक पद्धतीचा वापर केला जात आहे, तसेच घरबसल्या देखील हा दाखला सादर करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले असले, तरीही सर्व वयोवृद्ध निवृत्तीवेतन धारक आपला हयातीचा दाखला देण्यासाठी आवर्जून बँकेत जातात.
वास्तविक काही केंद्र सरकारी, डिफेन्स आणि राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचार्यांना हयातीचा दाखला देण्यासाठी त्यांचे निवृत्तीवेतन ज्या बँकेत जमा होते त्या बँकेत स्वतः जाऊन त्यांचा आधार क्रमांक आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) क्रमांक सिस्टीममध्ये टाकून त्यानंतर बायोमॅट्रिक उपकरणावर त्या पेन्शनधारकाचा अंगठा किंवा बोट ठेवून पडताळणी केली जाते.
त्यानंतर आधार डेटाशी बोटांचे ठसे मॅच झाल्यास तात्काळ ‘डिजिटल हयातीचा दाखला’ तयार होऊन सबमिट केला जातो. पण अनेकवेळा साधारण 80 ते 100 वयोगटातील वृद्धांना शारीरिक आजारपणामुळे त्यांच्या बोटांचे ठसे पुसट होतात. अशा वेळी बँकेतील बायोमॅट्रिक मशीनवर त्यांचे ठसे न जुळल्यामुळे त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.
हा त्रास जास्त करून स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्येष्ठ निवृत्तीवेतन धारकांना होतो अशा अनेकांच्या तक्रारी असून, याबाबत स्टेट बँकेसह इतर बँकांनी हयातीच्या दाखल्याचे फॉर्म उपलब्ध करणे गरजेचे आहे. जेणेकरून बायोमॅट्रिक मशीनवर जर ठसे जुळले नाहीत तर ती व्यक्ती हयातीचा दाखल्याचा फॉर्म भरून स्वतः स्वाक्षरी करून देऊ शकते.
पुणे येथील एका 85 वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाचे निवृत्तीवेतन भारतीय स्टेट बँकेच्या सांगवी शाखेत येत असून, मागील वर्षी बायोमॅट्रिक मशीनवर त्यांच्या अंगठ्याचे ठसे न उमटल्याने त्यांना बँकेच्या कर्मचार्यांनी स्टेट बँकेच्या गोळीबार मैदान शाखेत पाठवले. तेथे ते गेले असता बोटांच्या ठशांऐवजी त्यांना डोळे स्कॅन करण्यास सांगितले. पण तरीही काही तांत्रिक अडचण आल्यामुळे त्या शाखेने त्यांना ट्रेजरी ऑफिसमध्ये जाण्यास सांगितले.
ते गृहस्थ पुन्हा ट्रेजरी ऑफिसमध्ये दाखला देण्यासाठी गेले असता तुम्ही तुमच्या बँकेतच दाखला द्यावा अन्यथा 30 नोव्हेंबर नंतर इथे परत या, मग आम्ही तुमचा हयातीचा दाखला घेऊ असे उत्तर दिले. त्या व्यक्तीचे वय पाहता आयकर विभागाच्या नियमानुसार सुपर सीनियर सिटीझन (80 वर्षांवरील) व्यक्ती असल्याने त्यांची नकळत परवड चालली होती.
बँकेतून बायोमॅट्रिक मशीनवर त्यांचे काम न झाल्याने पुन्हा ती व्यक्ती डिसेंबर महिन्यात आदिदान व लेखा कार्यालय पुणे येथे स्टेट बँकेच्या निवृत्तीवेतन धारक कक्षात आली व आपला हयातीचा दाखला अखेर जमा केला. याला काय म्हणावे? तसेच आदिदान व लेखा कार्यालयाद्वारे निवृत्तीवेतन जेथे जमा होते त्या बँकेत पेन्शन खाते असलेल्या सर्व व्यक्तींच्या नावाची एक फाइल दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी पाठवली जाते व निवृत्तीवेतन धारकाने सर्व कागदपत्रांसह स्वतः बँकेत येऊन सही करावी लागते.
काही ठिकाणी सेतू सुविधा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रात दरवर्षी त्या-त्या निवृत्तीवेतन धारकाचे जीवनप्रमाणपत्र देण्याची सोय असते. याचे नाममात्र शुल्क घेतले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचे चित्र दिसते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जरी मोबाइलवर गूगल प्ले स्टोअरवरून Aadhaar Face RD आणि Jeevan Pramaan Face App डाउनलोड करून निवृत्तीवेतन धारकाची माहिती भरून मोबाइलच्या फ्रंट कॅमेर्याने चेहरा स्कॅन करून केवळ 5 मिनिटांत घरबसल्या हयातीचा दाखला जमा करता येत असला, तरी ही सुविधा 80 वर्षांवरील सर्व निवृत्तीवेतन धारकांना शक्य नाही.
तसेच काही निवृत्तीवेतन धारकांना आजारपणामुळे सही करणे शक्य नसते म्हणून ते अंगठा मारतात, तर शहरी व ग्रामीण भागात काही कुटुंबनिवृत्तीवेतन धारक प्रामुख्याने अंगठा मारतात.टपाल विभागातील निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतन टपाल कार्यालयात जमा होत असले तरी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) माध्यमातून पोस्ट इन्फोअॅपद्वारे पोस्टमन बायोमॅट्रिक डिव्हाइस घेऊन थेट घरी येतात आणि नाममात्र शुल्कात दाखला ऑनलाइन सबमिट करून देतात आणि जर दाखला ऑनलाइन सबमिट झाला नाही, तर टपाल विभागाच्या फॉर्मवर त्या निवृत्तीवेतन धारकाची सही किंवा अंगठा घेऊन रीतसर कार्यालात सबमिट करतात.
वास्तविक 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक निवृत्तीवेतन धारकांसाठी हयातीचा दाखला देण्याची ही प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासूनच सुरू असली, तरी 58 ते 79 या वयोगटातील किंवा 55व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या इतर शासकीय कर्मचार्यांना मात्र 01 नोव्हेंबरपासून आपला हयातीचा दाखला जमा करावा लागतो.
जरी आजच्या काळात तांत्रिक प्रगतीमुळे हयातीचा दाखला देणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले असले, तरी बायोमॅट्रिक पद्धतीद्वारे बोटांचे ठसे जुळणे, डोळ्यांच्या बाहुल्यांचे स्कॅन न होणे, तसेच चेहर्याची ओळख न पटणे या सारख्या तांत्रिक अडचणीचा ज्येष्ठ नागरिक निवृत्तीवेतन (Pension) धारकांना जरी सामना करावा लागत असला, तरी सर्व सरकारी बँकांनी हयातीच्या दाखल्याचे ऑफलाइन फॉर्म जर भरून घेतले तर नक्कीच हे काम वेळेत पूर्ण होऊन निवृत्तीवेतन धारकांनां हयातीचा दाखला देणे निश्चितच सोपे पडेल.






