अग्रलेख : ट्रम्प यांना धक्का !
इस्रायलच्या निवडणुकीनंतर तेथील मतदारांनी संघर्षवादी बेंजामिन नेतान्याहू यांना धडा शिकवल्यानंतर आता अमेरिकेतील मतदारांनी तेथील उद्दाम सत्ताधीश अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना धक्का देऊन तसाच धडा शिकवला आहे.

Donald Trump : इस्रायलच्या निवडणुकीनंतर तेथील मतदारांनी संघर्षवादी बेंजामिन नेतान्याहू यांना धडा शिकवल्यानंतर आता अमेरिकेतील मतदारांनी तेथील उद्दाम सत्ताधीश अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना धक्का देऊन तसाच धडा शिकवला आहे.
3 नोव्हेंबर 2026 रोजी झालेल्या अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. ही निवडणूक केवळ अमेरिकेच्या संसदेतील म्हणजेच काँग्रेसमधील जागांसाठी नव्हती, तर ती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दुसर्या कार्यकाळावर घेतलेला जनमत चाचणीचा कौल होता.
या कौलात अमेरिकन मतदारांनी स्पष्टपणे आपला राग व्यक्त केला असे दिसते. कारण डेमोक्रॅटिक पक्षाने या निवडणुकीत सिनेट आणि हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज या दोन्ही सभागृहांवर ताबा मिळवला आहे. दुसर्या महायुद्धानंतर केवळ पाचव्यांदा एखाद्या विरोधी पक्षाने मध्यावधी निवडणुकीत दोन्ही सभागृहे एकाच वेळी पलटवली आहेत.
या बदलाचा अर्थ समजून घ्यावा लागणार आहे. या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाकडे सिनेटमध्ये 53-47 असे बहुमत होते आणि हाउसमध्येही 219 विरुद्ध 215 असे किरकोळ बहुमत होते. आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. सिनेटमध्ये एकूण 100 जागा असतात. आता डेमोक्रॅट्स 54 जागांनी बहुमतावर आहे. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये एकूण 435 जागा असतात आणि तेथे सर्व जागांवर निवडणूक झाली. 218 जागा बहुमतासाठी लागतात.
डेमोक्रॅट्सनी 231 जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केला आहे. सर्व निकाल हाती येतील तेव्हा डेमोक्रॅट्सना आणखी जागा वाढू शकतात. या निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल सिनेटमध्ये लागले. कारण डेमोक्रॅट्सनी रिपब्लिकन पक्षाच्या बालेकिल्ल्यात शिरून जागा जिंकल्या आहेत. नॉर्थ कॅरोलिना, ओहायो (पोटनिवडणूक) आणि टेक्सासमधील पराभव ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का आहे.
केवळ काँग्रेसच नाही, तर राज्यांच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकांमध्येही डेमोक्रॅट्सनी बाजी मारली. 24 वर्षांनंतर जॉर्जियामध्ये डेमोक्रॅटिक गव्हर्नर निवडून आला आहे. आपण जगात सर्वात लोकप्रिय आहोत आणि आपले कोणी वाकडे करू शकत नाही असा दावा करणार्या नेत्याला मतदारांनी कसा धडा शिकवला याचे उत्तम उदाहण म्हणून या निकालाकडे पाहावे लागणार आहे.
महागाई, टॅरिफ, एआय डेटा सेंटर्स आणि इराण युद्ध या मुद्द्यांवर ट्रम्प यांच्या धोरणांबद्दल मतदारांनी स्पष्ट असंतोष व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या. डेमोक्रॅट्सनी याच मुद्द्याला टॅरिफ टॅक्स असे नाव दिले. अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये मोठ्या एआय डेटा सेंटर्समुळे वीज आणि पाण्याचे दर वाढले.
स्थानिक लोकांनी याला विरोध केला आणि हा मुद्दा निवडणुकीत गाजला. इराण युद्धाच्या निमित्ताने परदेशातील युद्धात अमेरिकेचा सहभाग पुन्हा वाढल्याने मतदार नाराज होते. ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’चे आश्वासन दिले होते, पण युद्धामुळे त्यांच्या समर्थकांमध्येच फूट पडली आणि त्याचाही फटका बसला. याशिवाय आरोग्य विम्याचे दर, महिलांचे अधिकार आणि लोकशाही संस्थांवरील दबाव या मुद्द्यांवरही तरुण आणि महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले.
आपण जे निर्णय घेतले होते ते योग्य होते अशी शेखी मिरवणार्या ट्रम्प यांना अमेरिकेतील तरुण मतदार आणि महिला मतदार यांनी मोठा धडा शिकवला आहे. निकालानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘जर मी स्वतः मतपत्रिकेवर असतो तर रिपब्लिकन जिंकले असते.
हा पराभव त्यांच्या धोरणांचा नसून मध्यावधी निवडणुकीतील नेहमीच्या कलाचा भाग आहे.’ मात्र डेमोक्रॅट्ससोबत काम करण्याची तयारी दाखवली. ही भाषा ट्रम्प यांच्यासाठी थोडी नरम मानली जात आहे. कारण आता काँग्रेसमध्ये कोणतेही विधेयक मंजूर करायचे असेल, तर त्यांना डेमोक्रॅट्सची गरज लागणार आहे.
ट्रम्प यांच्यासमोर आता अन्य पर्यायही नाही. अमेरिकेच्या या निवडणुकीने जे सत्ताबदल केले आहेत त्याचा जगावर काय परिणाम होणार आहे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये सत्ता बदलल्याने भारतासह संपूर्ण जगावर परिणाम होणारच आहे. डेमोक्रॅट्सनी टॅरिफविरोधात प्रचार केला असल्याने, भारतावर लावलेले जास्त आयात शुल्क कमी होण्याची शक्यता आहे.
याचा भारतीय निर्यातदारांना फायदा होऊ शकतो. एच-1बी व्हिसा आणि इमिग्रेशन याबाबतच्या ट्रम्प यांच्या कडक इमिग्रेशन धोरणाला आता काँग्रेसमध्ये विरोध होईल. इराण युद्ध आणि युक्रेन-रशिया युद्धात अमेरिकेची भूमिका आता काँग्रेसच्या तपासणीखाली येईल. युद्धासाठी निधी मंजूर करण्यासाठी ट्रम्प यांना आता डेमोक्रॅट्सना पटवावे लागेल.
एआय डेटा सेंटर्सवर नियमन आणण्याची मागणी डेमोक्रॅट्स करत आहेत. याचा परिणाम भारतातील एआय कंपन्यांवरही होऊ शकतो. मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर आता पुढील दोन वर्षे अमेरिकेत विभाजित सरकार असेल. म्हणजे राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचा असला तरी काँग्रेसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असणार आहे. अमेरिकन (Donald Trump) राजकारणात यास ग्रिडलॉक म्हणतात. या परिस्थितीत सरकार चालवणे अत्यंत कठीण असते.






