काबूल – तालिबानच्या कार्यपद्धतीनुसार आता सार्वजनिक ठिकाणी देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार नाही. किमान सर्वोच्च न्यायालयाने तसे आदेश दिल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे.
ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानच्या सत्तेची सूत्रे हातात घेतल्यापासून अनेक जणांना सार्वजनिक ठिकाणी देहदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच काही बंडखोरांना भर चौकात फाशी दिले गेले आहे. तर काहींचे मृतदेह चौकात लटकवून ठेवले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर तालिबानने आता ही शिक्षा न देण्याचा निर्णय घेतला आहे, असे तालिबानचे प्रवक्ता झबिबुल्ला मुजाहिदीन यांने म्हटले आहे.
जोपर्यंत दोषी ठरवले जाण्याला अनावश्यक प्रसिद्धी देणे गरजेचे नसेल आणि कोर्टाने तसे स्पष्ट निर्देश दिले नसतील, तर कोणालाही सार्वजनिक ठिकाणी देहदंडाशी शिक्षा दिली जाऊ नये. कोर्टाच्या आदेशांशिवाय सार्वजनिक ठिकाणी फाशी आणि मृतदेह लटकावून ठेवणे टाळले जायला पाहिजे, असे झबिबुल्ला मुजाहिदने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पूर्वीच्या काळी तालिबानकडून अशाप्रकारे सर्रास अशी शिक्षा दिली जात असायची. तो काळ पुन्हा अस्तित्वात येत असल्याची टीका अमेरिकेने सप्टेंबरमध्ये केली होती. तालिबानचा कारागृह प्रमुख आणि माजी न्याय मंत्री नुरुद्दीन तौरबी याने पुन्हा अशा शिक्षा दिल्या जाण्याचे सूतोवाच केले होते. मात्र अशी शिक्षा देणे म्हणजे दहशत पसरवणे अशी टीका अमेरिकेने केली होती.