प्रभात वृत्तसेवा नीरा – पुरंदर, भोर व वेल्हा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे नीरा खोर्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. वीर धरणात सतत वाढत असलेल्या पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाने मंगळवारी रात्री तब्बल 54 हजार 760 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला. या प्रचंड विसर्गामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत असून, पुणे-सातारा जिल्ह्यांना जोडणारा ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेला आहे. याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांसाठी महत्त्वाचे मानले जाणारा दत्तघाट आणि दत्त मंदिरही पाण्याखाली गेले आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या भोर, वेल्हे व पुरंदर भागात मागील दोन दिवसांत संततधार पाऊस झाला. याशिवाय नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. हे सर्व पाणी वीर धरणात मिळाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले. परिणामी सोमवारी सायंकाळी 6 हजार क्युसेक विसर्गाने नीरा नदीत पाणी सोडणायास सुरवात झाली त्यानंतर मंगळवारी दुपारी तो 33 हजार 53 क्युसेक, संध्याकाळी 42 हजार 724 क्युसेक तर रात्री अखेर 54 हजार 760 क्युसेक इतका करण्यात आला. या विसर्गामुळे नीरा नदी काठावरील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. यावर्षी नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल दुसर्यांदा पाण्याखाली गेला आहे. नवीन पुलामुळे याचा वाहतूकीवर कोणताही परिणाम होत नाही. फुलोर्यातील बाजरीसाठी अडचण.. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे नीरा खोर्यातील सर्व धरणे भरली असून, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकर्यांना खरीप हंगामासाठी पाण्याचा पुरवठा सुनिश्चित होणार आहे. पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळणार असला, तरी सध्या फुलोर्यात आलेल्या बाजरी पिकासाठी मात्र हा पाऊस अडचणीचा ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.