Indapur News – पिठेवाडी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याअभावी ठणठणीत कोरडा पडल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांवर चिंतेचे गडद सावट पसरले आहे. बंधाऱ्यावर अवलंबून शेती आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था धोक्यात आल्याने ग्रामीण भागात अस्वस्थता वाढली आहे. काही दिवसांत बंधाऱ्यातील पाणीसाठा पूर्णतः आटल्यामुळे नदीकाठचा शेतकरी वर्ग अक्षरशः हवालदिल झाला आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शेतीतील उभी पिके करपण्याच्या उंबरठ्यावर आहेत. रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, मका तसेच चारा पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता तरी शासनाने जागे व्हावे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे. बंधाऱ्यात पाणी नसल्याने आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही तीव्र होणार आहे. परिस्थितीवर वेळीच उपाय न केल्यास शेतीसह जनजीवन गंभीर संकटात सापडेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. बंधारा कोरडा पडल्याने निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांच्या अपेक्षा नीरा नदी पात्रात तातडीने पाणी सोडावे, बंधाऱ्यात पाणीसाठा वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, पाण्याची चणचण असनार्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व्यवस्था त्वरित सुरू करावी. पिके वाचवण्यासाठी तात्पुरत्या सिंचनास परवानगी द्यावी. संभाव्य नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी.