पुणे जिल्हा : नीरा नदीला पुन्हा पूर

वीर धरनातून 63 हजार क्युसेकने विसर्ग : ब्रिटिशकालीन पूल गेला पाण्याखाली
नीरा : मागील काही दिवसांपासून निरा नदीच्या खोर्यात होत असलेल्या संतधार पावसामुळे वीर धरणांमधून नीरा नदी पत्रात 63 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नीरा नदीला महापुराचे स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने सासवड-लोणंद मार्गावरील वीर धारणा खालील नीरानदीवरील पूल पाण्यात गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचबरोबर नीरा-सातारा दरम्यान नीरा नदीवर असणारा ब्रिटिशकालीन पूल देखील सायंकाळी साडेपाच वाजता पाण्याखाली गेला. शनिवारी (दि. 24) सकाळपासूनच नीरा खोर्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने वीर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
नीरा नदीच्या खोर्यामध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. भोर आणि वेल्हा म्हणजेच रायगड तालुक्यात डोंगर रांगांवर मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे नीरा नदी प्रणालीतीलमध्ये असलेल्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्यामुळे वीरधरणामध्ये इतर ठिकाणाहून देखील मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.
त्यामुळे वीरधरणांमधून शनिवारी सकाळपासूनच सुरुवातीला 15 हजार, दुपारी 33 हजार, चार वाजता 55 हजार तर सायंकाळी 5.30 वाजता 63 हजार क्युसेकने पाणी नीरानदी पत्रात सोडण्यात आले. त्यामुळे नीरा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नीरा नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्यावतीने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने पुढील काळामध्ये नदी पात्रामध्ये आणखी पाणी सोडले जाऊ शकते, असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
धरण टक्के विसर्ग (क्युसेकमध्ये)
भाटघर : 100 23 हजार 631
नीरा देवघर : 99.36 750
वीर : 100 63 हजार 273
गुंजवणी : 93.44 250
वीर (ता. पुरंदर) : धरणातून 63 हजार क्युसेकने नीरा नदीत विसर्ग सुरू आहे.
नीरा (ता. पुरंदर) : नीरा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रिटीशकालीन पूल पाण्याखाली गेला आहे.





