Indapur News – खोरोची येथील नीरा नदी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णपणे कोरडा पडल्याने इंदापूर आणि माळशिरस तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी शेती, जनावरे आणि नागरिकांचे जगणे धोक्यात आले असून, “आता तरी शासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. मागील काही दिवसांपासून बंधाऱ्यातील पाणीसाठा पूर्णपणे संपत आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. उभी पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शेती करायची कशी? जनावरांना पाणी द्यायचं कुठून? असा हताश प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. एप्रिल, मे आणि जून या महिन्यांमध्ये परिस्थिती आणखी भीषण होण्याची चिन्हे आहेत. चाऱ्याचा तुटवडा, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि रोजगाराचा प्रश्न एकाच वेळी डोके वर काढत असल्याने ग्रामीण भागात चिंतेचे सावट गडद होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आता शेती टिकवणे कठीण झाले, अशी वेदना व्यक्त केली आहे. नीरा नदी पाणी साठा याहून गंभीर बाब म्हणजे नीरा नदीवरील इतर बंधारेही पाण्याअभावी कोरडे पडले आहेत किंवा कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात पाण्याचे भीषण चित्र निर्माण झाले असून, उन्हाळा कसा काढायचा या विवंचनेत शेतकरी आणि नागरिक सापडले आहेत. या प्रश्नावर प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे जाणवत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर असताना कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. केवळ पाहणी आणि आश्वासने यावरच वेळ घालवला जात आहे, असा संताप व्यक्त होत आहे. सामाजिक आणि राजकीय पातळीवरही हा प्रश्न पेट घेण्याची चिन्हे आहेत. पाणीटंचाईसारख्या मूलभूत प्रश्नावर ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाणी हा आमचा हक्क आहे, दया नाही, असा इशारा शेतकरी देत आहेत. खोरोचीसह इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो शेतकरी आणि नागरिक सध्या पाण्यासाठी आक्रोश करत असून, शासनाने तातडीने उपाययोजना करून पाण्याची उपलब्धता करून द्यावी, अन्यथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल,असा इशारा देण्यात येत आहे.