पुणे जिल्हा : नीरा नदीला महापूर

खोर्यातील चारही धरणे ओव्हर फ्लो
नीरा – नीरा नदी खोर्यात असलेली चारही धरणे आता पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे. त्या पाण्यामुळे नीरा नदीला पूर सदृशस्थिती निर्माण झाली आहे. नीरा नदीकाठी असलेला दत्त घाट पाण्याखाली गेला आहे. तर नीरा नदीकाठच्या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याबरोबर नीरा नदीकाठच्या ब्रिटिश कालीन पुलाला हे पाणी टेकले आहे. तर पाटबंधारे विभागाच्यावतीने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
नीरा नदीच्या खोर्यामध्ये मागील तीन आठवड्यापासून संततधार पाऊस पडत आहे. डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस होत असल्याने हे पाणी नीरा खोर्यात असलेल्या धरणांमध्ये साठत आहे. त्यामुळे नीरा खोर्यातील चारही धरणे आता तुडुंब भरली आहेत. या धरणांमधून नीरा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नीरा नदीला महापूराची स्थिती निर्माण झाली आहे.
नीरा नदी खोर्यातील भाटघर नीरा देवघर धरण शुक्रवारी (दि. 3) तुडुंब भरले आणि या धरणाच्या स्वयंचलित दरवाजामधून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. तत्पूर्वीच नीरा नदीमध्ये वीर धारणामधून 15 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यात या दोन्ही धरणातून येणार्या पाण्याची भर पडली आणि वीरधरणांमधून पाणी सोडण्याच्या प्रमाणात मोठी वाढ करण्यात आली. गेली दोन वर्षे नीरा नदीला कोणत्याही प्रकारे पूर आला नव्हता. मात्र मागील पंधरा दिवसापासून नीरा नदीचे पाणी थांबलेले नाही. नीरा नदीला आलेल पाणी पाहून नीराकाठचा शेतकरी सुखावला असला तरी वरूणराजा आणखीच बरसत राहिला तर मोठे नुकसान होऊ शकते असे म्हणत शेतकर्यांच्या चेहर्यावर आता चिंतेची लकीर सुद्धा पाहिला मिळत आहे.
गेल्यावर्षीपेक्षा आठ टिमएमसी अधिक साठाअ
चारही धरणात मिळून एकूण 46.755 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत 8 टीएमसी इतका जास्त असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
वीरमधून 43 हजार क्युसेकने विसर्ग
वीर धरणांमधून नीरा नदी पात्रामध्ये शनिवारी (दि. 3) दिवसभर 43 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. दिवसभर याच प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने निरा नदी काठच्या गावांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
धरण पाणीसाठा (टीएमसी) टक्के विसर्ग
भाटघर 23.502 100 15631
नीरा देवघर 11.126 94.86 4538
वीर 8.868 94.26 42983
गुंजवणी 3.259 88.33 2174





