Nilesh Ghare Firing Case : गोळीबाराचा थरार संपला! निलेश घारे प्रकरणात तिघे अटकेत…; वारजे पोलिसांची जबरदस्त कामगिरी

पुणे : शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी निलेश घारे यांच्या मोटारीवर झालेल्या गोळीबाराचा उलगडा वारजे पोलिसांनी केला. तिघांना अटक केली. पोलीस संरक्षण, तसेच शस्त्र परवाना मिळवण्यासाठी घारे यांनी मोटारीवर बनाव रचल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी रात्री घारे यांना अटक करण्यात आली.
निलेश घारे यांचे येथील वारजे भागातील गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय असून, १९ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या मोटारीच्या काचेवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. त्या वेळी घारे कार्यालयात होते.
याबाबत घारे यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि पथक तपास करत होते.
घारे यांच्या मोटारीवर झालेल्या गोळीबारात त्यांचे परिचित असलेले सचिन गोळे, शुभम खेमणार, अजय उर्फ बगली सकपाळ यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार संकेत मातले हा पसार झाला होता.
पोलिसांनी गोळे, खेमणार, सकपाळ यांना वारजे भागातून ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत निलेश घारे यांनीच गोळीबार करायला लावल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
घारे यांच्या मोटारीवर झालेल्या गोळीबाराचा पोलिसांंकडून विविध शक्यता गृहित धरून तपास करण्यात आला. घारे यांनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांनी पोलीस संरक्षण मागितले होते.
शस्त्र परवानाा मिळवण्यासाठी गोळीबाराचा बनाव रचला असावा, अशी शक्यता होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास केला. तपासात घारे यांनी गोळीबाराचा बनाव रचल्याचे उघड झाले. त्यानंतर बुधवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली. असे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले





