वॉशिंग्टन – सोशल मीडियाचा वापर करणे अमेरिकेतील एका महिला न्यायाधीशाला चांगलेच महागात पडले आहे. ओक्लाहामा येथील न्यायालयात हत्येच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना न्यायाधीश सोशल मीडियात व्यस्त असल्याचे आढळून आल्यामुळे या प्रकरणाच्या तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. या न्यायाधीशांची अलिकडेच त्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तपास पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
त्यांच्या न्यायालयात हत्येशी संबंधित खटल्याची सुनावणी सुरू असताना न्यायाधीश मात्र सोशल मीडियावर व्यस्त असल्याचे दिसून आले. याबाबतचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाल्यामुळे हा विषय चर्चेचा ठरला आहे. सुनावणी सुरू असतानाच न्यायाधीश काहीतरी टाइप करत असल्याचे आणि चित्रपट सर्च करत असल्याचेही व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसते आहे.
सोडरस्टॉर्म हे त्या 50 वर्षीय न्यायाधीशांचे नाव असून गेल्या महिन्यातही न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना त्या फेसबुकवर सर्च करत असल्याचे आढळून आले होते. त्यांची मागच्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात या पदावर नियुक्ती करण्यात आली असून जानेवारी मध्ये त्यांना पदाची शपथ देण्यात आली होती.
सोडरस्टॉर्म यांच्याबाबतच्या बातम्या एका वर्तमान पत्रात प्रसिध्द झाल्यावर त्यांना याबाबत प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी काही भाष्य करण्यास नकार दिला आहे. तपास अधिकाऱ्यांसमोर आपल्याला काय म्हणायचे आहे ते आपण मांडू आणि अमेरिकेत प्रलंबित बाबींवर काही भाष्य करण्यास प्रतिबंध असल्याचे त्यांनी सांगितले. एका युवकाने आपल्या प्रेयसीच्या अडीच वर्षांच्या मुलाची हत्या केल्याच्या प्रकरणाची सुनावणी सोडरस्टॉर्म यांच्या न्यायालयात सुरू होती. या प्रकरणात संबंधित युवकाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.