व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) – व्हिएन्नामध्ये अनेक ठिकाणी केलेल्या गोळीबारात तीन जण मरण पावले. तर सात जण जखमी झाले. ऑस्ट्रियाचे चॅन्सलर सेबिस्टीयन कुर्झ यांनी घृणास्पद दहशतवादी हल्ला असे या हल्ल्याचे वर्णन केले आहे. पोलिसांनी एका संशयिताला कंठस्नान घातले. त्याची ओळख पटली असून तो इस्लामिक स्टेटस् या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. अन्य एका हल्लेखोराला शोधण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम आखली आहे.
हा हल्ला एका सभास्थानासह सहा ठिकाणी करण्यात आला. या हल्ल्यात अनेक हल्लेखोर सहभागी झाल्याचे पोलिसांनी सोमवारी रात्री म्हटले होते. लॉकडाऊन सुरू करण्याआधी काही हा गोळीबार करण्यात आला. नागरिक आपली मोकळीक एन्जॉय करण्यासाठी रेस्टॉरंट आणि बारमध्ये मोठ्या संख्येने आले होते. ही संधी साधून हा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात जखमी झालेले तीन जण मंगळवारी मरण पावले. त्यात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले. व्हिएन्नाचे महापौर मायकेल लुडविग म्हणाले, या हल्ल्यात 15 जण जखमी झाले असून त्यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारीही जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास या हल्ल्याला सुरुवात झाली.
मृत हल्लेखोर हा धर्मांध होता. त्याचे इस्लामिक स्टेटस्ची निकटचे संबंध होते. त्याबाबतचे प्रथमदर्शनी सर्व पुरावे सापडले आहेत. तो ज्या अपार्टमेंट राहात होता तेथे पोहोचण्यासाठी पोलिसांना स्फोट घडवावा लागला. त्यावेळी या मृत व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. एक हल्लेखोर मेला असला तरी आणखी एक हल्लेखोर अद्याप रस्त्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. मुलांनी शाळेत जाऊ नये. सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळावा, असे आवाहन ऑस्ट्रिया सरकारने केले आहे. जागात प्रसिद्ध असणाऱ्या ऑपेरा हाऊसजवळ मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शी म्हणतात…
“आम्हाला सुरुवातीला त्यांनी खूप दारू प्यायली असावी किंवा एखाद्या अमेरिकन चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असावे असे वाटले. नंतर आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकला. त्यानंतर पोलिसांनी बाहेर पडू नका असे सांगितले, असे 42 वर्षीय वेटर जिमी इरोग्लू यांनी सांगितले.
रॉबर्ट स्चेनेइदर यांच्या छातीला दोन गोळ्या चाटून गेल्या. ते म्हणाले, हॅंडस अप जाकीट काढ असे एक पोलीस अधिकारी ओरडल्याचे आम्ही ऐकले. त्यानंतर ना आम्ही काही पाहिले, ना ऐकले. आम्ही अद्याप मानसिक धक्क्यातून सावरलेले नाही आहोत.
सहवेदना…
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी ट्विट केले की, आम्ही ऑस्ट्रियन नागरिकांचे दु:ख आणि धक्क्यात सहभागी आहोत. फ्रान्सपाठोपाठ आमच्या मित्रराष्ट्रावर हल्ला केला आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याचे ट्विट युरोपियन महासंघाचे प्रमुख मायकेल मिशेल यांनी केले. युरोपियन आणि जगभरातील अनेक नेत्यांनी ऑस्ट्रियाला आपला पाठिंबा दिला आहे.