ABP Cvoter Opinion Poll Telangana 2023: केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (9 ऑक्टोबर) तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यात राजकीय बिगुल वाजला आहे. तेलंगणातील विधानसभेच्या 119 जागांसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे.
येथे भारत राष्ट्र समिती (BRS), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान, एबीपी न्यूज सी-व्होटर ओपिनियन पोल जाहीर झाला आहे. या सर्वेक्षणानुसार तेलंगणात या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. तेलंगणात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 60 जागांच्या विजयाने पूर्ण होईल.
या ओपिनियन पोलमध्ये सुमारे 90 हजार लोकांशी बोलण्यात आले आहे. हे सर्वेक्षण 1 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलेआहे.
कोणाला किती मते मिळतील?
या निवडणुकीत काँग्रेसला एकूण 39 टक्के मते मिळू शकतात. त्याचवेळी बीआरएसला 38 टक्के मते मिळू शकतात. याशिवाय भाजपला 16 टक्के आणि इतरांना 7 टक्के मते मिळू शकतात.
सर्वाधिक जागा कोणाला मिळू शकतात?
जागांचे बोलायचे झाले तर काँग्रेस राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. ओपिनियन पोलनुसार तेलंगणात काँग्रेसला 48 ते 60 जागा मिळताना दिसत आहेत. त्याचवेळी बीआरएसला 43 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. तेलंगणात जोरदार प्रयत्न करणाऱ्या भाजपला 5 ते 11 तर इतरांना 5 ते 11 जागा मिळू शकतात.
2018 मध्ये तेलंगणाच्या निवडणुकीचे निकाल काय होते?
2018 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती) ने 88 जागा जिंकल्या होत्या. पक्षाला एकूण 47.4 टक्के मते मिळाली आणि के. चंद्रशेखर राव (KCR) मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी काँग्रेस 19 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यांना एकूण 28.7 टक्के मते मिळाली होती.