वेलिंग्टन :- न्यूझिंलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स हे व्यापारी शिष्टमंडळासह चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्याची विशेषता म्हणजे ते आपल्याबरोबर एक रिकामे विमान घेऊन चीनला गेले आहेत. बोईंग 757 विमानाच्या तांत्रिक समस्या उद्भवल्याच्या बातम्या सारख्या पुढे याऊ लागल्यामुळे चीनच्या दौऱ्यावर जाताना पर्यायी व्यवस्था म्हणून हे दुसरे विमानही बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय हिपकिन्स यांनी घेतला आहे.
ख्रिस हिपकिन्स यांच्या विमानाच्या पाठोपाठ हे रिकामे विमान चीनच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. हे दुसरे विमान फिलिपाईन्सची राजधानी मनिलाला जाऊन थांबले आहे. हिपकिन्स चीनच्या दौऱ्यावर गेले असताना प्रभारी पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या कार्मेल सेपुलोमी यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
पंतप्रधान चीनमध्ये असताना विमानाला काही अडचण यायला नको. मात्र जर तशी काही अडचण आलीच, तर पंतप्रधानांसाठी पर्यायी विमान उपलब्ध असावे, म्हणून हे दुसरे विमान सज्ज ठेवण्यात येणार आहे, असे सेपुलोमी यांनी सांगितले.
हिपकिन्स ज्या विमानाने चीनला गेले आहेत, ते रॉयल न्यूझिलंड एअरफोर्सचे विमान 30 वर्षे जुने आहे. हे विमान 2030 साली सेवेतून निवृत्त केले जाणार आहे. आतापर्यंतच्या हवाई सेवेदरम्यान ते अनेकदा बंद पडलेले आहे.
2016 साली न्यूझिलंडचे पंतप्रधान जॉन के हे भारताकडे येताना त्यांचे विमान बिघडले होते आणि त्यांना न्यूझिलंडवरून दुसरे विमान उपलब्ध होईपर्यंत ऑस्ट्रेलियात थांबावे लागले होते. वेळ वाया गेल्यामुळे जॉन के यांना मुंबईची भेट रद्द करावी लागली होती.