NEET PG 2026 : दोन महिने वाया गेल्यावर अखेर मुहूर्त लागला! वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाची तिसरी फेरी ‘या’ तारखेपासून
NEET PG 2026 : नव्या जागा वाढल्यामुळे प्रक्रियेला ब्रेक; आता तांत्रिक अडथळे दूर करून परीक्षेचे अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध.

NEET PG 2026 – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीचे सुधारित वेळापत्रक अखेर जाहीर केले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सूचनेनुसार आता ९ फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रत्यक्षात वर्ग डिसेंबरमध्येच सुरू झाल्याने उशिरा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीनंतर देशातील जागा मोठ्या प्रमाणात वाढवल्या. या निर्णयामुळे प्रक्रियेला विलंब झाला. ३ जानेवारीला होणारी तिसरी फेरी लांबणीवर पडली होती. आता नव्या वेळापत्रकानुसार ९ फेब्रुवारीला राज्य कोट्यातील जागांचा तपशील जाहीर होईल. ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन पसंतीक्रम भरता येतील.
१३ फेब्रुवारीला गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.प्रवेशाला विलंबाचे ग्रहण लागले असून पहिली फेरी २० नोव्हेंबरला झाल्यानंतर दुसरी फेरी महिनाभर लांबली. दरम्यान, २२ डिसेंबरपासूनच महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत.
याचा अर्थ, तिसऱ्या आणि त्यानंतरच्या फेरीत प्रवेश घेणारे विद्यार्थी अभ्यासाबाबतीत सुमारे दोन महिने मागे असतील. महत्त्वाचे विषय आणि प्रात्यक्षिके आधीच सुरू झाली आहेत, मग आम्ही हा अनुशेष कसा भरून काढणार? असा सवाल विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे.
प्रवेश प्रक्रियेतील या गोंधळामुळे आणि विलंबाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष तांत्रिकदृष्ट्या सुरू झाले असले तरी, प्रत्यक्ष ज्ञानापासून ते वंचित राहत आहेत. दरम्यान, उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.



