LLB Admission – राज्यातील विधी (लाॅ) महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘एलएलबी‘ (३ वर्षीय) सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) नोंदणीत यंदा मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ हजार विद्यार्थ्यांनी विधी क्षेत्राकडे पाठ फिरवल्याचे समोर आले असून, यंदा ८२,८८३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. दरम्यान, अर्ज भरताना तांत्रिक चुका झालेल्या उमेदवारांना राज्य सीईटी सेलने ९ ते ११ मार्च दरम्यान ‘विंडो’ खुली केली असून, अर्जातील दुरुस्तीसाठी ही शेवटची संधी असणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया ३ मार्च रोजी पूर्ण झाली. सीईटीसाठी अर्ज नोंदणी करताना अनेक विद्यार्थ्यांना अनवधानाने काही तांत्रिक चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही विशेष सवलत देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरून आपली नोंदणी पूर्ण केली आहे, त्यांनाच ही दुरुस्तीची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक लॉगिनमध्ये जाऊन नाव, जन्मतारीख, छायाचित्र, स्वाक्षरी आणि लिंग या पर्यायांमध्ये बदल करता येतील. तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गेल्या चार वर्षांपासून चढ-उतार पाहत आहे. २०२३-२४ मध्ये ७६,४२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ती २०२५-२६ मध्ये ९४,५०६ या विक्रमी आकड्यावर पोहोचली होती. मात्र, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १२ हजारांनी घट झाली असून, यंदा हा आकडा ८२,८८३ वर स्थिरावला आहे. चार वर्षांतील नोंदणीचा आढावा – शैक्षणिक वर्ष नोंदणी केलेले विद्यार्थी -२०२३-२४ : ७६,४२५ -२०२४-२५ : ८०,१२५ -२०२५-२६ : ९४,५०६ -२०२६-२७: ८२,८८३