MAH CET 2026 – उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सात प्रमुख अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या अंतिम तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये विधी (लाॅ), शारीरिक शिक्षण आणि अध्यापक शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यावर्षीच्या प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी येत्या २४ मार्चपासून सुरू होत असून, १७ मे पर्यंत एकूण १७ सीईटी परीक्षा होणार आहेत. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४५ दिवस या प्रवेश प्रक्रिया सुरू राहतील. आतापर्यंत राज्यभरातून १२ लाख ९४ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली असून, दोन्ही संधी मिळून सुमारे १७ लाख ४२ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दि. २४ मार्चला एम.पी.एड. परीक्षेने या सीईटीची सुरुवात होईल. त्यानंतर एम.एड. (२५ मार्च), बीएड (२७ ते २९ मार्च), एलएलबी ३ वर्षीय (१ ते २ एप्रिल), बी.पी.एड. (४ एप्रिल) आणि बीएड, एम.एड. एकात्मिक अभ्यासक्रम (९ एप्रिल) या परीक्षा होतील. एलएलबी ५ वर्षीय अभ्यासक्रमाची परीक्षा ८ मे रोजी होणार असून, यासाठी १५ मार्चपर्यंत नोंदणीची अंतिम संधी उपलब्ध आहे. संबंधित अभ्यासक्रमांची प्रवेशपत्रे परीक्षेच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन उपलब्ध करून दिली जातील. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे हॉल तिकीट आणि अद्ययावत सूचनांसाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.