थरारक..! नवी मुंबईत धावत्या ट्रेनखाली महिलेने झोकून दिलं; शरीराचे झाले 2 तुकडे
Navi Mumbai : खारघर रेल्वे स्टेशनवर एका महिलेने आत्महत्या केली असून भायखळा येथे रुळ ओलांडताना एकाचा मृत्यू झाला आहे.

Navi Mumbai : नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक घटना घडली असून, एका महिलेने धावत्या ट्रेनखाली झोकून आत्महत्या केली. या भीषण घटनेत महिलेच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. ट्रेन थांबल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक प्रवासी ट्रेनमधून खाली उतरून स्टेशनवर आले.
माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, तिच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून हळहळ व्यक्त केली जात असून, रेल्वे परिसरातील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
रुळ ओलांडताना व्यक्तीचा मृत्यू
मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे स्टेशन आणि चिंचपोकळी रेल्वे स्टेशन दरम्यान रुळ ओलांडताना एका व्यक्तीचा भीषण अपघात झाला. या अपघातात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. रेल्वे प्रशासनाने तात्काळ बचावकार्य करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.





