Kapil Dev Warning : “इतक्यात सचिनशी तुलना नको, कांबळीचं उदाहरण पाहा!”; वैभव सूर्यवंशीबाबत कपिल देव यांनी दिला महत्त्वाचा इशारा
Kapil Dev Warning : भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीबाबत आपलं वेगळं मत मांडलं आहे.

Kapil Dev Warning On Vaibhav Sooryavanshi Vinod Kambli Prithvi Shaw Comparison : भारताचा ‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Suryavanshi) आक्रमक खेळाची तुलना क्रिकेटवर्तुळात अनेकदा सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांशी केली जात आहे. मात्र, भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी यावर अत्यंत वेगळा आणि सावध दृष्टिकोन मांडला आहे. वैभवची थेट तुलना दिग्गजांशी करण्याऐवजी कपिल देव यांनी विनोद कांबळीचा थेट दाखला देत, मिळालेले यश आणि स्टारडम सांभाळणे किती कठीण असते, याची जाणीव करून दिली आहे.
“अनेक प्रतिभावान हरवून गेले; विनोद कांबळीचे उदाहरण घ्या!”; कपिल देव यांचे वक्तव्य
कपिल देव म्हणाले की, “वैभवमध्ये अफाट क्षमता आहे यात शंका नाही, पण आताच मोठे अंदाज बांधणे अत्यंत घाईचे ठरेल. क्रिकेटच्या इतिहासात अफाट गुणवत्ता असलेले अनेक खेळाडू आले, मात्र ते नंतर मुख्य प्रवाहातून अचानक गायब झाले. विनोद कांबळीचे उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे. वैभव अजून अवघ्या १५ वर्षांचा आहे, त्याला किमान पुढील तीन वर्षे द्या, त्यानंतरच आपण त्याच्यावर चर्चा करू.”
कामगिरीपेक्षा जीवनशैली महत्त्वाची; पैसा अन् प्रसिद्धीचा धोका!
🚨So many have faded out – Kapil Dev cautioned Vaibhav Sooryavanshi with Vinod Kambli example🤯
Kapil Dev said :🗣️
“Its too early to say anything about him. Does he have the ability? Yes. But there have been so many in cricket who came with so much ability, then faded out. Look at Vinod Kambli. What we will say about that? Vaibhav is 15 years old. Give him another three years, then we will talk. When his lifestyle changes, his thinking too will change. Then we’ll come to know how he will look after the next two years. That is more important than looking at his performance”.
— Akshat (@Cricketmythos) October 8, 2026
कपिल देव यांनी युवा खेळाडूच्या धावांपेक्षा त्याच्या वागणुकीवर आणि जीवनशैलीवर अधिक भर दिला. ते म्हणाले की, कमी वयात जेव्हा अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळते, तेव्हा खेळाडूची जीवनशैली आणि विचारसरणी दोन्ही बदलतात. त्या झगमगाटात तो आपल्या खेळाप्रती किती प्रामाणिक राहतो आणि या बदलांना कसे हाताळतो, हे पाहणे पुढील दोन वर्षांत कामगिरीपेक्षा जास्त महत्त्वाचे ठरणार आहे.
पृथ्वी शॉचे उदाहरण ताजे; स्टारडम पचवणे मोठे आव्हान!
वैभवपूर्वी पृथ्वी शॉनेही अगदी कमी वयात चमक दाखवत संघात स्थान मिळवले होते. मात्र, मैदानावरील शिस्त आणि वादांमुळे त्याचे स्टारडम टिकू शकले नाही आणि आज त्याचा पुनरागमनाचा मार्ग खडतर झाला आहे. त्यामुळे वैभवने अशा चुका टाळून केवळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे, असा मोलाचा सल्ला कपिल देव यांनी दिला.





