Ravi Shastri Controversy : “मला हटवण्यामागे वेगळेच राजकारण होते!”, १० वर्षांनंतर रवी शास्त्रींनी सोडले मौन; २०१६ मध्ये डावलल्याच्या वेदना उघड
Ravi Shastri Controversy : रवी शास्त्री यांना क्रिकेट संचालक पदावरून हटवण्यात आले आणि मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले, परंतु नंतर त्यांच्याऐवजी अनिल कुंबळे यांची निवड झाली. यामुळे ते नाराज झाले. मात्र, नंतर ते मुख्य प्रशिक्षक पदावर परतले.

Ravi Shastri Breaks Silence On 2016 Coach Removal Sourav Ganguly Dispute : भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी तब्बल १० वर्षांनंतर २०१६ मधील प्रशिक्षक निवडीच्या वादग्रस्त प्रकरणावर मौन सोडले आहे. २०१४ मध्ये टीम इंडियाचे ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ बनलेल्या शास्त्रींना २०१६ मध्ये बीसीसीआयने अचानक मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) शास्त्रींना डावलून अनिल कुंबळे यांची नियुक्ती केली होती. मुलाखतीवेळी गांगुली अनुपस्थित राहिल्याने मोठा गदारोळ झाला होता. आता शास्त्रींनी त्या वेळच्या कटू आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे.
“माझ्या कामात त्रुटी नव्हती, कारण वेगळेच होते!”; शास्त्रींचे परखड भाष्य
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले की, “२०१६ मध्ये मला पदावरून बाजूला करण्याचे गुणवत्तेच्या आधारावर कोणतेही कारण नव्हते; त्यामागील कारण काही वेगळेच होते. संघ उभारणीसाठी मी जीवाचे रान केले होते आणि त्याचे परिणामही दिसत होते. तरीही मला बाहेर बसवले गेले, या गोष्टीने मला आतून प्रचंड वेदना दिल्या. त्या निर्णयाने माझे मन खूप दुखावले होते.”
अपमानातून घेतला धडा; समालोचनात पुनरागमन करून समजून घेतले खेळाडूंचे मन!
🚨There was motive behind me being shafted out – Ravi Shastri says his removal as Indian team director of cricket hurt🤯
Ravi Shastri said :🗣️
“In 2014 I took over, I was the director of the side and came in 2016. They said, No, we don’t want any director now. You apply for a head coach position. And there should have been no reason why I should not have carried on sheer merit. So, there was obviously some other reason, some morive behind why you were shafted out. That hurt me. You know, that hurt me. If you look back at my career, that hurt me a loy because you had given your heart and soul in getting the team to where it was, and you could see, the fruits being delivered in a matter of time. Now and then you had to go and sit out”.
— Akshat (@Cricketmythos) October 8, 2026
त्या धक्क्यानंतर शास्त्री पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये परतले. त्या काळाबद्दल बोलताना ते म्हणाले की, तो दीड वर्षांचा काळ खूप काही शिकवून गेला. नव्या पिढीचे (Gen-Z) खेळाडू कसा विचार करतात, हे ड्रेसिंग रूमबाहेर राहून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळाली. हा मोठा झटका पचवून त्यांनी स्वतःला नव्या आव्हानासाठी सज्ज केले.
दुसऱ्या इनिंगमध्ये इतिहास रचला; ऑस्ट्रेलियात सलग दोन कसोटी मालिका विजय!
“जेव्हा तुम्ही पुनरागमन करता, तेव्हा अधिक मजबूत होऊन परतता,” असे सांगत शास्त्रींनी २०१७ ते २०२१ या काळातील सुवर्णयुगाची आठवण करून दिली. कुंबळे यांच्यानंतर पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी आलेल्या शास्त्रींच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सलग दोन ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकून जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व सिद्ध केले.





