Jason Rowles SA20 : १८ वर्षीय युवा खेळाडू SA20 लिलावात ठरला सर्वात महागडा! एमआयला धोबीपछाड देत सुपर किंग्सने मारली बाजी
Jason Rowles SA20 : जेसन रॉल्स फक्त १८ वर्षांचा आहे, पण त्याच्या स्फोटक फलंदाजीने त्याला दक्षिण आफ्रिकेत आधीच मोठे नाव मिळवून दिले आहे. डेवाल्ड ब्रेविसप्रमाणे, तो लवकरच दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचा सदस्य होऊ शकतो.

SA20 Auction Jason Rowles Most Expensive Player Joburg Super Kings Faf Du Plessis : दक्षिण आफ्रिका टी-२० लीगच्या (SA20) आगामी पाचव्या मोसमाच्या लिलावात अवघ्या १८ वर्षांच्या जेसन रॉल्सने (Jason Rowles) इतिहास रचला आहे. तो या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असून, जोबर्ग सुपर किंग्सने त्याला तब्बल २.९ दशलक्ष दक्षिण आफ्रिकन रँड (सुमारे १.६९ कोटी रुपये) मोजून आपल्या ताफ्यात सामील केले. त्याच्यासाठी एमआय केपटाऊन आणि जोबर्ग सुपर किंग्स यांच्यात चुरशीची बोली लागली; मात्र अखेर सुपर किंग्सने बाजी मारली.
फाफ ड्युप्लेसी अन् किरॉन पोलार्डही सुपर किंग्सच्या गळाला!
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिससाठीही एमआयने सर्व ताकद पणाला लावली होती; पण जोबर्ग सुपर किंग्सने १.५७ कोटी रुपयांना (१,६२,२८६ डॉलर्स) त्याला पुन्हा संघात कायम राखले. डु प्लेसिस सलग पाचव्या हंगामात याच संघाकडून खेळेल. याशिवाय टी-२० मधील दिग्गज फलंदाज किरॉन पोलार्डला सुपर किंग्सने ८७.२४ लाख रुपयांना खरेदी करत आपला संघ अधिक मजबूत केला.
एमआयने मुल्डर-हेटमायरला घेतले; बावुमा प्रिटोरिया कॅपिटल्समध्ये!
J Rowles Roars! 🦁
Can’t wait to see more, Jason! 💥#WhistleForJoburg https://t.co/MtD8IbtZRy
— Joburg Super Kings (@JSKSA20) October 8, 2026
एमआय केपटाऊनने अष्टपैलू वियान मुल्डरला १.५१ कोटी रुपयांना आणि विंडीजचा आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायरला आपल्या ताफ्यात जोडले. दुसरीकडे, प्रिटोरिया कॅपिटल्सने रस्सी व्हॅन डर डुसेनवर २९.०७ लाख रुपयांची बोली लावली. सनरायझर्स ईस्टर्न केपला दोनदा चॅम्पियन बनवणारा ३६ वर्षीय टेम्बा बावुमाही यंदा प्रिटोरिया कॅपिटल्सकडून मैदानात उतरेल.
भविष्याचा नवा सुपरस्टार; १७ जानेवारी २०२७ पासून महासंग्राम!
18 years old. R2.9 million!
Welcome, Jason Rowles.
#BetwaySA20Auction https://t.co/GYCVh4gOtS— Betway SA20 (@SA20_League) October 7, 2026
१८ वर्षीय जेसन रॉल्ससाठी दोन बलाढ्य फ्रँचायझींमध्ये झालेली चढाओढ तो भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्टार असल्याचे दर्शवते. दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचा पाचवा मोसम रविवार, १७ जानेवारी २०२७ पासून सुरू होणार आहे. उद्घाटनाच्या लढतीत गतविजेता सनरायझर्स ईस्टर्न केप सेंट जॉर्ज पार्क येथे प्रिटोरिया कॅपिटल्सशी भिडणार आहे.





