National Sports Awards : रांकीरेड्डी व चिरगला खेलरत्न तर शमीला अर्जुन पुरस्कार प्रदान, विजेत्यांची संपूर्ण यादी पहा…

नवी दिल्ली – भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जात असलेल्या खेलरत्न पुरस्काराने तर भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमी याला मंगळवारी मानाच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राचा स्टार तिरंदाज ओजस देवताळे व अव्वल महिला तिरंदाज अदीती स्वामी यांचाही अर्जुन पुरस्काराने गोरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी येथे झालेल्या एका खास सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अर्जुन पुरस्कार मिळालेला शमी हा भारताचा ५८ वा क्रिकेटपटू आहे. यामध्ये १२ महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तब्बल दोन वर्षांनंतर एका क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी शिखर धवनला २०२१ साली हा पुरस्कार मिळाला होता. अर्जुन पुरस्कार मिळवणारे सलीम दुर्रानी हे पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्यांना १९६१ साली या पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. शमीसह देशातील विविध क्रीडा क्षेत्रात सरस कामगिरी केलेल्या खेळाडूंचाही यावेळी विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. एकूण २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेल्या वर्षी पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर शमी दुखापतीमुळे विविध सामन्यंना मुकला आहे. मात्र, विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याची कामगिरी त्याच्या नावावर जमा झाली आहे. त्याने या स्पर्धेत ७ सामने खेळताना तब्बल २४ बळी मिळवले होते. याच स्पर्धेच्या अंतिम लढतीत तो दुखापत झालेली असतानाही खेळला होता. मात्र, त्यानंतर अद्याप तो तंदुरुस्त ठरलेलानाही.
स्वप्नपूर्चीचा आनंद – शमी
अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर शमीने आनंद व्यक्त केला आहे. अर्जुन पुरस्कार मिळणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. काही माणसे यासाठी सर्वस्व पणाला लावतात तर अनेकांचे आयुष्य निघून जाते पण तरीही काही व्यक्तींना हा पुरस्कार मिळत नाही. तसेच, काहींना आयुष्याच्या अगदी अखेरीस हा मान मिळतो. मी नशीबवान आहे की मला हा पुरस्कार योग्य वेळी मिळाला. मी सगळ्या देशवासियांचे व चाहत्यांचे आभार मानतो.
Asian Olympic qualifiers shooting : भारतीय नेमबाज वरुणसह ईशाने मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…
पुरस्कार विजेते खेळाडू – खेलरत्न पुरस्कार – चिराग शेट्टी व सात्विक साईराज रांकीरेड्डी (बॅडमिंटन), अर्जुन पुरस्कार – ओजस देवतळे व अदीती स्वामी (तीरंदाजी), श्रीशंकर व पारुल चौधरी (अथलेटिक्स), महंमद हुसामुद्दीन (मुष्टियुद्ध), आर वैशाली (बुद्धिबळ), महंमद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल (घोडेस्वारी), दिव्यकृती सिंग (घोडेस्वारी ड्रेसेज), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक व सुशीला चानू (हॉकी), पवनकुमार व रितू नेगी (कबड्डी), सारीन (खो-खो), पिंकी (लॉन बॉल्स), ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर व ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग (स्क्वॅश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार व अंतिम पंघल (कुस्ती), रोशी बिना देवी (वुशु), शीतल देवी (पैरा तीरंदाजी), अजय कुमार (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).
IPL 2024 : भारतात यावर्षी आयपीएल होणार नाही? समोर आलं ‘हे’ मोठं कारण…
द्रोणाचार्य पुरस्कार – ललित कुमार (कुस्ती), आर. बी. रमेश (बुद्धिबळ), महेवीरसिंग प्रसाद सैनी (पॅरा अथलिट), शिवेंद्र सिंग (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब).
द्रोणाचार्य पुरस्कार जीवन गौरव – जसकीरत सिग ग्रेवाल (गोल्फ), इ भास्करन (कबड्डी), जयंत कुमार पुषीलाल (टेबल टेनिस).
ध्यानचंद पुरस्कार (क्रीडा व क्रीडा व्यवस्थापन निवृत्तीनंतर) – मंजुषा कंवर (बॅडमिंटन), वीनित कुमार (हॉकी), कविथा सेल्वराज (कबड्डी)
मौलाना अबुल कलाम आझाद करंडक (विद्यापीठ क्रीडा स्पर्धा) – गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर (सर्वसाधारण विजेते), लवली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब आणि कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र (उपविजेते).
खेलरत्नमुळे नवी उमेद – सात्विक-चिराग
देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात मानाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न क्रीडा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच परंतू या मुळे कारकीर्दीसाठी नवी उमेद मिळाली अशा शब्दात बॅडमिंटनपटू सात्विक साईराड रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडगळीने आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या मोसमात मिळवलेल्या सातत्यपूर्ण यशाचीच हा पुरस्कार ही पावती आहे. त्यामुळे खूप मोठी प्रेरणा मिळाली असून देशाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सेनेरी यश मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. ऑलिम्पिकचे सुवर्णपदक पटकावले तरच हा पुरस्कार सार्थ ठरेल, असाही आम्हाला विश्वास आहे, असेही या दोन खेळाडूंनी म्हटले आहे.





