Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘या’ 5 खेळांमध्ये भारताचे पदक जवळपास निश्चित…

India’s Medals In Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू होण्याचे दिवस हळूहळू जवळ येत आहेत. यावेळी 33व्या ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघात 113 खेळाडूंचा समावेश असेल, जे विविध खेळांमध्ये सहभागी होतील. यापूर्वी 2020 टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरले होते.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 7 पदके जिंकली होती. यावेळी भारतीय खेळाडूंना हा आकडा पार करायला नक्कीच आवडेल. दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये पाच खेळामध्ये भारत पदक जिंकणार हे जवळपास निश्चित आहे.
1. भालाफेक : यापूर्वी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने भालाफेकीत एकमेव सुवर्णपदक जिंकले होते. स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने भारतासाठी हे सुवर्णपदक जिंकले होते. तसेच त्यानंतर झालेल्या अनेक स्पर्धेतही त्यांनी दमदार यश मिळवले आहे, त्यामुळे गेल्यावेळेप्रमाणेच या वेळीही नीरजकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत नीरज या ऑलिम्पिकमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
2. बॅडमिंटन : भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने आतापर्यंत 2 ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली महिला ठरली. सिंधूने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता पुन्हा एकदा पीव्ही सिंधूकडून बॅडमिंटनमध्ये पदक मिळवण्याची अपेक्षा आहे. यावेळी भारतीय स्टारकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
3. गोल्फ : गोल्फमध्ये यावेळी भारताची स्टार गोल्फर अदिती अशोककडून पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अदितीचे पदक थोडक्यात हुकले होते. ती चौथ्या स्थानावर राहिली होती. आता या वेळी म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रोफेशनल गोल्ड टूर ऑफ इंडियाचे नवनियुक्त अध्यक्ष कपिल देव यांनीही अदिती अशोक पदक जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
4. बॉक्सिंग : बॉक्सिंगमध्ये भारताला दोन पदके मिळू शकतात. स्टार बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 75 किलो वजनी गटात सहभागी झालेल्या लोव्हलिना बोरगोहेनकडून यावेळी सुवर्णपदक मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली स्टार निखत जरीनही भारताला सुवर्णपदक मिळवून देऊ शकते. निखत हि 50 किलो वजनी गटात पात्र ठरली आहे.
5. वेटलिफ्टिंग : टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. मीराबाई चानूने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते. यावेळीही मीराबाई चानूकडून पदकाची अपेक्षा आहे.





