IND vs SA : ‘माझ्या भविष्याचा निर्णय BCCI घेईल…’, द. आफ्रिकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया

२५ वर्षांत मायभूमीत दुसऱ्यांदा क्लीन स्वीप –
या पराभवामुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठे नकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. २५ वर्षात दुसऱ्या भारतीय संघाला आपल्या मायभूमीत कसोटी मालिकेत क्लीन स्वीप मिळाला आहे. यापूर्वी, २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताला ०-३ फरकाने पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाच्या सातत्याने घसरत असलेल्या कामगिरीमुळे टीम व्यवस्थापन आणि कोचिंग स्टाफच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
गौतम गंभीर यांची नाराजी आणि जबाबदारी –
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या दारुण पराभवानंतर तीव्र निराशा व्यक्त केली. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गंभीर यांनी स्पष्ट केले की, संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी केवळ खेळाडूंवर टाकली जाऊ शकत नाही. ते म्हणाले, “माझ्या भविष्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. इंग्लंडमधील विजय आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी यशोगाथा माझ्या नावासोबत जोडली गेली आहे, पण आजच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे आणि तिची सुरुवात माझ्यापासून होते.”
हेही वाचा – IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने भारताचा धुरळा उडवत रचला इतिहास! 25 वर्षांनी घरात घुसून चारीमुंड्या केले चीत
गौतम गंभीर यांनी हे देखील मान्य केले की ९५/१ वरून १२२/७ पर्यंत संघ कोसळणे कोणत्याही संघासाठी स्वीकारार्ह नाही. त्यांनी कोणत्याही विशिष्ट खेळाडूला किंवा शॉट निवडीला दोष न देता, ही सामूहिक चूक असल्याचे सांगितले आणि संपूर्ण टीमला एकत्र येऊन चांगला खेळ दाखवावा लागेल, असे मत व्यक्त केले.
कोचिंगमधील खराब टेस्ट रेकॉर्ड –
गौतम गंभीर यांनी जुलै २०२४ मध्ये मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात भारताने आतापर्यंत एकूण १८ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी १० सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. हा आकडा दर्शवतो की गेल्या काही महिन्यांपासून टीमचा कसोटीतील आलेख सातत्याने घसरत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, संघात विशेष गोलंदाज आणि फलंदाजांऐवजी अधिक अष्टपैलूंवर अवलंबून राहणे हे पराभवाचे मोठे कारण ठरले आहे.





