मराठी माणूस न्याय हक्कासाठी गुवाहाटीला जाणार का? उद्धव ठाकरे यांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

Maratha Reservation – मुंबई ही मराठी माणसांची राजधानी आहे. न्याय मागण्यासाठी मराठी माणूस सूरत किंवा गुवाहाटीला जाणार का? नाईलाजाने मराठी माणसाला न्याय हक्कासाठी मुंबईला यावे लागले. कारण या सरकारने सांगितले होते की, त्यांचे सरकार आले की काही दिवसात न्याय देऊ. दुसरे आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती.
परंतु आतापर्यंत या लोकांना फक्त वापरून फेकून देण्यात आले आहे. त्यामुळे आता ही लोकं मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा जो काही न्याय हक्क आहे, तो त्यांना दिला पाहिजे, अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन ज्यांनी आरक्षण देऊ असे सांगितले होते, तेच लोक आज सत्तेमध्ये आहेत. कारण मी जरी आज काही म्हटले, तरी माझ्या हातात काहीच नाही. त्यामुळे कोण कोणाच्या खांद्यावर बंदूक घेऊन चालवत आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा आणि एवढंच जर असेल तर जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवू देण्याची वेळ तुम्ही का येऊ दिलीत, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत मराठ्यांना खूप वेळा फसवण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली आहे. पण याच्यापुढे काही चित्र हाललेले नाही. त्याच्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे. कारण मी याआधी मनोज जरांगे यांच्यासमोर माझी भूमिका मांडलेली आहे.
त्यामुळे मी आता काहीही बोललो तरी सरकार काय करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे, असा चिमटा काढतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारने पुढाकार घेऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मराठी माणसं दंगल करायला नाही, तर न्याय हक्कासाठी आलेली आहेत.
त्यामुळे ज्यांनी आरक्षण देऊ असं म्हटलं होतं, ते गावी पळाले आहेत. सरकारने हा प्रश्न हाताळला पाहिजे. दहा जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्ही थेट आंदोलकांशी बोला, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केले.





