Australia Beats Bangladesh : अवघ्या २ दिवसांत बांगलादेशचा सुपडा साफ! ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताचा WTC फायनलचा मार्ग झाला सुकर
Australia Beats Bangladesh : ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला हरवल्यामुळे डब्ल्यूटीसी स्पर्धेत भारताचा मार्ग सोपा झाला आहे.

Australia Beats Bangladesh By An Innings And 51 Runs Mackay 2nd Test : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा अवघ्या दोन दिवसांत एक डाव आणि ५१ धावांनी धुव्वा उडवला आहे. मॅके येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या ६४ धावांत संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१० धावा करत १४६ धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर बांगलादेशचा दुसरा डावही अवघ्या ९५ धावांत गडगडला.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) सामन्यात १० विकेट्स घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. या निकालामुळे डब्ल्यूटीसी (WTC 2025-27) स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघाची वाट अधिक सोपी झाली आहे. कारण भारताला आता पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी पोहोचण्याची संधी चालून आहे, ती कशी आहे? जाणून घेऊया.
बांगलादेशचा पीसीटी घसरला; टीम इंडियासाठी टॉप-४ ची दारे उघडली!
पहिल्या कसोटीतील विजयानंतर बांगलादेश ६६.६७ टक्के पीसीटीसह (PCT) गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता. मात्र, दुसऱ्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर त्यांचा PCT घसरून थेट ५५.५६ टक्क्यांवर आला आहे. पराभवानंतरही बांगलादेश तात्पुरता चौथ्या स्थानावर टिकून असला, तरी त्यांच्या गुणांची टक्केवारी खालावल्यामुळे पाचव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला मोठी संधी चालून आली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने आपला पीसीटी ७७.७८ वरून ८० टक्क्यांवर नेत अव्वल स्थानावरील आपली पकड आणखी मजबूत केली आहे.
A massive response in Mackay to wrap the Test up just after tea on day two.
All the #AUSvBAN action: https://t.co/drrfqp5tb0 pic.twitter.com/30BmhX6SAz
— cricket.com.au (@cricketcomau) August 23, 2026
बांगलादेशला पछाडण्यासाठी टीम इंडियाला काय करावे लागेल?
भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये दुसरी कसोटी खेळत आहे. भारताने हा सामना जिंकल्यास टीम इंडियाचा पीसीटी ५३.३३ वरून ५७.५८ टक्क्यांवर पोहोचेल. असे झाल्यास भारतीय संघ बांगलादेशला थेट मागे टाकून पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेईल. भारताने या चक्रात आतापर्यंत १० पैकी ५ सामने जिंकले असून, ४ सामन्यांत पराभव आणि १ अनिर्णित अशी कामगिरी केली आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल; दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंडची चुरस!
डब्ल्यूटीसी २०२५-२७ च्या ताज्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया १० सामन्यांत ८ विजयांसह आणि ८०% गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. गतविजेता दक्षिण आफ्रिका ७५% गुणांसह दुसऱ्या स्थानी असून त्यांनी ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडचा संघ ७० टक्क्यांपेक्षा जास्त पीसीटीसह तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशच्या पराभवामुळे आता टॉप-४ मधील चुरस अधिक रंगतदार झाली असून भारताच्या विजयावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.





