IND vs SA South africa beat India in Test Series : गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४०८ धावांनी धुव्वा उडवत कसोटी मालिकेत २-० ने क्लीन स्वीप केला. या विजयासह, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २५ वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. यापूर्वी, २००० साली दक्षिण आफ्रिकेने भारतामध्ये टीम इंडियाला २-० ने क्लीन स्वीप केले होते. दक्षिण आफ्रिकेने उभारले धावांचे डोंगर – या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ५४९ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले होते. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी ५२२ धावांची आवश्यकता होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताचे दोन गडी बाद झाले होते. मात्र, शेवटच्या दिवशी दोन सत्रांच्या आत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उर्वरित ८ विकेट्स घेत ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयात त्यांचे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही मोलाची भूमिका बजावली. हार्मर आणि यान्सन ठरले विजयाचे शिल्पकार – दक्षिण आफ्रिकेच्या या ऐतिहासिक विजयात त्यांच्या गोलंदाजांचे प्रदर्शन निर्णायक ठरले. दुसऱ्या डावातील विजयाचा खरा नायक सायमन हार्मर ठरला. त्याने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या, तर पहिल्या डावात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. अशा प्रकारे, हार्मरने संपूर्ण सामन्यात ९ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याचबरोबर मार्को यान्सन याने पहिल्या डावात ६ विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीमध्येही त्याने शानदार ९३ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात त्याला एक विकेट मिळाली. हेही वाचा – Kabaddi World Cup 2025 : भारतीय महिला कबड्डी संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता! चायनीज तायपेईचा 35-28 ने उडवला धुव्वा सामन्याचा सर्व घटनाक्रम – दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सेनुरन मुथुसामीच्या (१०९ धावा) शतकाच्या बळावर पहिल्या डावात ४८९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाचा पहिला डाव केवळ २०१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून सर्वाधिक धावा यशस्वी जैस्वालने (५८) केल्या. मात्र, इतर सर्व फलंदाजांनी आफ्रिकन गोलंदाजांपुढे सपशेल शरणागती पत्करली. हेही वाचा – Laxmi Ratan Shukla : ‘ही देशाची टीम आहे, कुणाच्या घरची नाही…’, शमीच्या कोचचा आगरकर-गंभीरवर थेट हल्लाबोल दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २६० धावांवर डाव घोषित करत भारतासमोर ५४९ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ १४० धावा करून ऑलआऊट झाला आणि ४०८ धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने (५४) भारताकडून सर्वाधिक धावांचे योगदान दिले.