Atharva Ankolekar Injury : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! सलग तीन पराभवानंतर अष्टपैलू खेळाडू आयपीएलमधून पडला बाहेर
Atharva Ankolekar Injury : पंजाब किंग्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मुंबईचा युवा अष्टपैलू खेळाडू आयपीएल २०२६ मधून बाहेर पडला आहे.

Atharva Ankolekar Injury IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात सलग तीन पराभवांच्या धक्क्याने सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबई इंडियन्स (MI) संघाला आता दुखापतीचा मोठा फटका बसला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मुंबईचा युवा अष्टपैलू खेळाडू अथर्व अंकोलेकर दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी एका नव्या दमाच्या खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे.
पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. १६ एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी भारताच्या २०२० अंडर-१९ विश्वचषक संघाचा भाग असलेला फिरकी अष्टपैलू अथर्व अंकोलेकर दुखापतीमुळे आयपीएल २०२६ मधून बाहेर पडला आहे. आयपीएलने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून याला दुजोरा दिला आहे. तसेच मुंबईने अथर्व अंकोलेकरच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे.
Mumbai Indians have signed Krish Bhagat as a replacement for Atharva Ankolekar, who has been ruled out of IPL 2026 due to injury.
Krish Bhagat joins MI at his base price of INR 30 lakh. pic.twitter.com/oL6yGJcCbL
— CricTracker (@Cricketracker) April 16, 2026
कोण आहे कृष भगत?
अथर्व अंकोलेकरच्या जागी मुंबईने पंजाबच्या कृष भगत या २१ वर्षीय अष्टपैलू खेळाडूला ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर संघात सामील केले आहे. कृष भगत हा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज असून तो खालच्या क्रमांकावर चांगली फलंदाजीही करू शकतो. त्याने पंजाबसाठी ७ प्रथम श्रेणी आणि ९ लिस्ट-ए सामने खेळले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तो मुंबई इंडियन्सच्या ट्रायल्सचा भाग होता आणि यंदाच्या हंगामात तो नेट बॉलर म्हणून संघासोबत वावरत होता. त्याच्या समावेशामुळे मुंबईच्या गोलंदाजीला नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
गुणतालिकेत मुंबई इंडियन्स तळाशी –
मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयाने केली होती. मात्र, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीविरुद्ध त्यांना सलग तीन पराभव पत्करावे लागले आहेत. सध्या मुंबईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर असून, प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी त्यांना आता विजयाची नितांत गरज आहे. अथर्व अंकोलेकरसारखा गुणवान खेळाडू बाहेर जाणे हा मुंबईसाठी मानसिक धक्का मानला जात आहे, कारण त्याने अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध सामनावीर पुरस्कार पटकावला होता.





