KS Bharat Retires : डब्लूटीसी फायनल खेळणाऱ्या भारतीय खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती; विराट-रोहितबाबत पोस्टमध्ये केला खास उल्लेख
KS Bharat Retires : टीम इंडियाच्या ३२ वर्षीय खेळाडूने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला आहे.

KS Bharat Retires From International Cricket : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज श्रीकर भरत याने अवघ्या ३२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवास फार मोठा नसला, तरी कसोटी (टेस्ट) क्रिकेटमध्ये ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत त्याने काही महत्त्वाच्या प्रसंगी यष्टीमागे आपली भूमिका चोख बजावली होती. केएस भरतने आपला शेवटचा कसोटी सामना २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता, त्यानंतर संघात पुनरागमन करण्यासाठी तो सातत्याने झगडत होता.
सोशल मीडियावर भावूक पोस्ट; विराट-रोहितचे मानले आभार
केएस भरतने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याने भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे विशेष आभार मानले. भरत म्हणाला की, “या दोन्ही महान खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळणे आणि त्यांच्याकडून शिकणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर अनुभव होता. ड्रेसिंग रूममध्ये या वरिष्ठ खेळाडूंकडून मिळालेले समर्थन आणि मार्गदर्शन माझ्यासाठी नेहमीच संस्मरणीय राहील.”
View this post on Instagram
त्याने पोस्टमध्ये पुढे लिहिले, “अत्यंत अभिमानाने मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य होते. या प्रवासात खूप संयम आणि शक्तीची गरज होती, पण भारतासाठी कसोटी खेळणे यातील प्रत्येक क्षणाची किंमत वसूल करणारे होते. बीसीसीआय, सर्व प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाचे मनापासून आभार. सहकाऱ्यांशिवाय माझे हे स्वप्न पूर्ण करणे अशक्य होते.”
केएस भरतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आणि डब्लूटीसी फायनलचा मान!
श्रीकर भरतने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत टीम इंडियासाठी एकूण ७ कसोटी सामने खेळले. या ७ सामन्यांच्या १२ डावांत त्याने २०.०९ च्या सरासरीने २२१ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून एकही शतक किंवा अर्धशतक आले नसले, तरी यष्टीरक्षक म्हणून त्याने आपल्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले होते. त्याच्या याच उत्कृष्ट यष्टीरक्षणाच्या जोरावर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३’ च्या फायनल सामन्यातही भारतीय संघाचा मुख्य यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरला होता. त्याच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.





