Top 10 Sports News : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, आकृति अग्रवालचा खुलासा अन् बुद्धिबळात भारताचा डंका! पाहा क्रीडा विश्वातील टॉप-10 घडामोडी
Top 10 Sports News : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, आकृति अग्रवालचा खुलासा अन् बुद्धिबळात भारताचा डंका!

Top 10 Sports News :
1. मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी
बुद्धिबळात भारताचा डंका!
मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या क्रिशव कवित शाह याने दमदार कामगिरी केलीय. पंधरा वर्षांखालील गटात अव्वल स्थान मिळवत त्याने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत क्रिशवने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण चार पदके मिळवली. क्वालालंपूर येथील सिटिटेल मिड व्हॅली हॉटेलमध्ये ४ ते १२ ऑक्टोबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. (Top 10 Sports News)
2. अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड
सर्वात जलद २ हजार धावा पूर्ण
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. अभिषेकने टी-२० मध्ये चेंडूंच्या हिशोबाने सर्वात जलद २,००० धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या १,०२४ चेंडूंचा सामना केला. यापूर्वी हा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर होता, ज्याने १,१६४ चेंडूंत ही कामगिरी केली होती.
3. पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा
पुन्हा एकत्र आल्याची दिली माहिती
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि आकृति अग्रवाल यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. साखरपुडा मोडल्याच्या चर्चांनंतर दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आकृतिने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली. या पोस्टमध्ये तिने साखरपुडा मोडण्यामागील परिस्थिती आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या मतांचा आपल्या निर्णयावर प्रभाव पडला होता असे तिने पोस्टमध्ये सांगितले.
4. लव्हलिना बोरगोहेनला आसाम सरकारकडून मोठे गिफ्ट
कोट्यवधींची जमीन दिली अवघ्या १ रुपयात
आसाममध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनच्या स्पोर्ट्स अकादमीला मोठा दिलासा देत सरकारने तिच्या बॉक्सिंग अकादमीसाठी वाटप करण्यात आलेल्या जमिनीचा सेटलमेंट प्रीमियम पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. राज्य सरकारने अवघ्या १ रुपयाच्या नाममात्र दराने या जमिनीचे हस्तांतरण मंजूर केले.
5. “माझी आई ॲडमिट असताना नाना दर आठवड्याला फोन करायचे
पाकिस्तानी क्रिकेटपटू बासित अलीकडून मैत्रीला उजाळा
नानांच्या निधनाचे वृत्त समजताच पाकिस्तानचा माजी कसोटी क्रिकेटपटू बासित अली अत्यंत भावुक झाला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून नानांबरोबरच्या मैत्रीला उजाळा दिली. “माझी आई जेव्हा आजारी होती आणि रुग्णालयात दाखल होती, तेव्हा नानाजी दर आठवड्याला न चुकता फोन करायचे. ते माझ्या आईशी तासनतास गप्पा मारायचे, जुने किस्से सांगायचे आणि तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करायचे. आईच्या निधनानंतरही त्यांनी मला धीर दिला होता असे बासित अली म्हणाले. (Top 10 Sports News)
6. तुषार देशपांडेने वानखेडेवर रचला इतिहास
बॅट-बॉलने केला डबल धमाका
रणजी करंडक स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध चंदीगड सामना पार पडला. या सामन्यात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने गोलंदाजीमध्ये हॅटट्रिक नोंदवत नवा इतिहास रचला. रणजी करंडकात हॅटट्रिक घेणारा तो मुंबईचा केवळ सहावा गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात तुषारने केवळ चेंडूनेच नव्हे तर बॅटनेही मोलाचे योगदान दिले. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने ४७ चेंडूंत उपयुक्त ४४ धावा कुटल्या, ज्यामुळे मुंबईला चारशेचा टप्पा ओलांडता आला.
7. बांगलादेशी पेसर हसन महमूदचा अबू धाबीत थरार
भारताच्या विक्रमाशी केली बरोबरी
बांगलादेशचा २७ वर्षीय वेगवान गोलंदाज हसन महमूदने मोठी कामगिरी केलीय. त्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ५० वी हॅटट्रिक नोंदवण्याचा अनोखा पराक्रम केलाय. तसेच कसोटीत हॅटट्रिक घेणारा तो बांगलादेशचा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह तो आलोक कपाली आणि सोहाग गाझी यांच्यानंतर कसोटीत हॅटट्रिक घेणारा बांगलादेशचा केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. तसेच हसन महमूदच्या या कामगिरीमुळे सर्वाधिक कसोटी हॅटट्रिक नोंदवणाऱ्या देशांच्या यादीत बांगलादेशने भारताच्या ३ हॅटट्रिकच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. (Top 10 Sports News)
8. आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी सर्वात मोठा ट्रेड
यॉर्कर किंग टी नटराजनची सनरायझर्स हैदराबाद संघात घरवापसी
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी एक मोठा निर्णय घेतलाय. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाने भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज टी नटराजन याला पुन्हा आपल्या संघात सामील करून घेतले आहे तर फिरकीपटू झीशान अन्सारीला दिल्ली कॅपिटल्सकडे सोपवण्यात आले आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळाडूंची अदलाबदल अधिकृतपणे पूर्ण झाली आहे.
9. सूर्यकुमार यादवने दुबईत खरेदी केले आलिशान घर
बनला शाहरुख खानचा शेजारी
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने दुबईत एक लक्झरी घर खरेदी केले असून, या नव्या घरामुळे तो आता बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा शेजारी बनला आहे. सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक विशेष व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना ही गोड बातमी दिली. सूर्या आणि त्याच्या कुटुंबासाठी हा एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
10. शुबमन गिलने रचला इतिहास !
पाच वेळा जिंकला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार
शुबमन गिलने ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. त्याने यंदा दोन्ही फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडत प्रत्येक मालिकेत आपल्या कामगिरीची छाप पाडलीय. आयसीसीच्या सप्टेंबर महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार शुबमन गिलला देण्यात आला आहे. यासह तो आतापर्यंत पाच वेळा ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. जानेवारी २०२३, सप्टेंबर २०२३, फेब्रुवारी २०२५, जुलै २०२५ नंतर आता सप्टेंबर २०२६ मध्ये त्याने हा पुरस्कार पटकावलाय. (Top 10 Sports News)






