IPL 2024 (Gujarat vs Punjab Match 17) : आयपीएल 2024 स्पर्धेत आज संध्याकाळी 7.30 वाजता गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. IPL 2024 चा 17 वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम गुजरातने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर पंजाबने 3 पैकी एक सामना जिंकला आहे. गिलसोबत शिखर धवन आणि सॅम कुरन हे देखील गुजरात आणि पंजाब यांच्यातील सामन्यात त्यांच्या संघासाठी गेम चेंजर ठरू शकतात.
शिखर धवन – धवन हा अनुभवी खेळाडू आहे. या मोसमात आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो सध्या अव्वल स्थानावर आहे. धवनने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. या कालावधीत 137 धावा केल्या आहेत. धवननेही अर्धशतक झळकावले आहे. तो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. धवनची बॅट चालली तर गुजरातच्या गोलंदाजांच्या अडचणी वाढतील. धवनने 220 IPL सामन्यात 6 हजार 754 धावा केल्या आहेत. त्याने 2 शतके आणि 51 अर्धशतके केली आहेत.
शुभमन गिल – गुजरातचा कर्णधार शुभमन गिल गेल्या मोसमात ऑरेंज कॅपचा विजेता ठरला होता. त्याने 17 सामन्यात 890 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली होती. शुभमनला या मोसमात आतापर्यंत काही विशेष करता आलेले नाही. पण पंजाबविरुद्ध तो चांगली कामगिरी करू शकतो. गिलने हैदराबादविरुद्ध 36 धावांची इनिंग खेळली होती तर त्याने मुंबईविरुद्ध 31 धावा केल्या होत्या.
सॅम करन – सॅम करन हा पंजाब किंग्जच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध घातक गोलंदाजी केली. करनने 28 धावांत 3 बळी घेतले होते. त्याने आक्रमक फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतकही झळकावले होते. त्याने 63 धावा केल्या होत्या. आता पुन्हा एकदा तो चमत्कार दाखवू शकतो. सॅम करनने 49 आयपीएल सामन्यांमध्ये 699 धावा केल्या आहेत. तसेच या कालावधीत 46 विकेट्स घेतल्या आहेत.