नवी दिल्ली – 2020 मधील सोने तस्करी प्रकरणातील एका “मोस्ट वॉन्टेड’ आरोपीला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने अटक केली आहे. राजस्थानमधील जयपूर विमानतळावर 2020 मध्ये 18.56 किलो सोन्याच्या कांड्या जप्त करण्यात आल्या होत्या.
या सोन्याची किंमत 9 कोटी रुपये होती आणि हे सोने सौदी अरेबियामधून आयात केले जात होते. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने हे सोने भारतात आणले जात असताना जयपूर विमानतळावर पकडले गेले होते.
या सोन्याच्या तस्करी प्रकरणी मूळ राजस्थानमधील मोहब्बत अली हा “मोस्ट वॉन्टेड’ होता. 2020 च्या सप्टेंबर पासून तो फरार होता. त्याच्याविरोधात “रेड कॉर्नर नोटीस’ आणि “लुक आऊट नोटीस’ देखील बजावण्यात आली होती.
“एनआयए’ ने 22 मार्च 2021 रोजी मोहब्बत अली विरुद्ध भारतीय दंड संहिता आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. त्याच्या अटकेला उपयुक्त माहिती देणाऱ्याला 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.