पिंपरी – एरिक्सन आणि सेव्ह द चिल्ड्रन यांच्या सहाय्याने पिंपरी चिंचवड महानगर पालिका येथील जिजामाता हॉस्पिटलच्या नवजात अतिदक्षता विभागाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.
0 ते १२ वर्षे वयोगटातील सौम्य किंवा गंभीर आजारी मुलांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, एरिक्सन इंडिया ग्लोबल सर्विसेस आणि सेव्ह द चिल्ड्रन संस्थेने आधुनिक नवजात अतिदक्षता विभागाचे मजबुतीकरण करण्यासाठी (NICU) जीवनरक्षक उपकरणे देऊन साहाय्य केले. यामध्ये क्रिटिकल केअर सुविधा देण्यासाठी उपयुक्त साहित्य व्हेंटिलेटर, रेडियंट वॉर्मर्स, एक्स-रे मशीन, फोटोथेरपी मशीन, इ. सी. जी. मशीन्स, आणि इतर जीवनरक्षक उपकरणे प्रदान करण्यात आली आहेत.
या प्रसंगी बोलताना आरोग्य विभागप्रमुख डॉ. गोफणे म्हणाले, रुग्णालयात हा नव्याने बांधलेला नवजात अतिदक्षता विभाग, पहिल्या वर्षातच १५,००० हून अधिक मुलांची सेवा करेल. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे म्हणाल्या, आम्ही येथे येणाऱ्या महिला आणि मुलांसाठी स्त्रीरोग आणि बालरोग सेवा सुरू केल्या आहेत. संस्थेने दिलेल्या साहित्यामुळे आम्ही आमचे एनआयसीयू अपग्रेड करू शकलो.
सेव्ह द चिल्ड्रनच्या राज्य व्यवस्थापक प्रणामी गर्ग सेंटरच्या म्हणाल्या की, बालरोग विभाग आणि अतिदक्षता विभाग आज बाळांमधील गंभीर आजार बरे करण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी एक अत्यावश्यक गरज बनला आहे. सेव्ह द चिल्ड्रन, एरिक्सन इंडिया, जिजामाता हॉस्पिटल यांच्या संयुक्त उपक्रमाने साकार झालेल्या या एनआयसीयू मध्ये येणाऱ्या मुलांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील पदाधिकारी, सीएसआर सेल चे प्रमुख, पोमण, वावरे, सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे अधिकारी, आणि जिजामाता हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी जिजामाता हॉस्पिटल मधील डॉ. सुनिता साळवे, डॉ. ख्रिस्तोफर झेवियर, सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या प्रकल्प समन्वयक दीपाली देशमुख यांनी परिश्रम घेतले.