MLC Election : विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार? पार्थ पवारांच्या ‘त्या’ आश्वासनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
MLC Election : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्ष बळकटीकरणासाठी शहरातील नेत्याला संधी देण्याची मागणी; अंतर्गत इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षश्रेष्ठींसमोर पेच.

MLC Election – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. याबाबत सध्या राजकीय चर्चा जोरदार सुरू असून अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. दुसरीकडे शहरातील एखाद्या नेत्याला विधान परिषदेसाठी संधी मिळावी, यासाठी स्थानिक नेते जोर लावत आहेत.
पुण्यातील जागेसाठी महायुतीतून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक लढेल अशी शक्यता आहे. पुणे जिल्हयात सर्वाधिक मते महायुतीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे आहेत. परंतु भाजप आणि शिवसेनेच्या मतांची बेरीज त्याहून अधिक आहे. यामुळे या जागेबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. भाजपने आधीच शहरात दोन विधान परिषदेचे आमदार दिले असल्याने भाजपच्या नेत्यांना आता संधी मिळण्याची शक्यता नाही.
दुसरीकडे राष्ट्रवादी वगळता इतर कोणत्याही पक्षाकडे मतांचे संख्याबळ नाही. यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची चर्चा सर्वाधिक आहे. शहरातील राष्ट्रवादीचे अनेक नेते विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. परंतु पक्ष पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर की ग्रामीण यापैकी कोणाला संधी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यात एकूण मते ८७८ असून त्यापैकी सर्वाधिक ३७५ राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे आहेत.
त्यापाठोपाठ भाजपकडे ३३५ आणि शिवसेनेकडे ८२ आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नव्हते. परंतु ग्रामीण भागात मिळालेल्या भरघोस मतदानाच्या जोरावर राष्ट्रवादी आपला उमेदवार विधान परिषदेत पाठवू शकण्याच्या स्थितीत आहे. यामुळे राष्ट्रवादी पुणे किंवा पिंपरी-चिंचवड शहरातील उमेदवार देणार की ग्रामीण भागातून कुणाला संधी देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याची दाट शक्यता असून दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरील चर्चेतून राष्ट्रवादीच्या बाजूने सकारात्मक संकेत मिळाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पक्षातील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आता या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या मते शहरातील तीन पैकी दोन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असताना देखील भाजपने शहरात आणखी दोन विधान परिषदेचे आमदार देत संघटना मजबूत केली. राष्ट्रवादीचा एकच आमदार शहरात आहे. पक्षाच्या बळकटीकरणासाठी आणखी एक आमदार देण्याची गरज आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांना बळ दिले पाहिजे.
परंतु एक जागेसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातून इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या पाहता पक्षासमोर उमेदवारी कोणाला द्यायची ही डोकेदुखी ठरत आहे. पक्षाने नाव निश्चित केल्याची चर्चा देखील रंगत असून त्यात पुण्यातील एक नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.
पार्थ पवारांच्या आश्वासनाची आठवण
लोकसभा निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी संघटना टिकवून ठेवत स्व. अजितदादा पवार आणि पार्थ पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. याच दरम्यान शहरात एका कार्यक्रमात पार्थ पवार यांनी शहरातील नेत्यांना संधी देण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच भविष्यात स्थानिक नेत्यांना बळ देण्यासाठी संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते.






