PCMC News : स्वीकृत नगरसेवक निवड आता थेट जुलैमध्ये? भाजपच्या ‘या’ खेळीमुळे इच्छुक नेत्यांची झोप उडाली
PCMC News : महापालिकेची ५ मे ची सभा तहकूब करून सत्ताधाऱ्यांनी खेळली नवी खेळी; अंतर्गत मतभेद आणि आचारसंहितेच्या कचाट्यात इच्छुक उमेदवार हतबल.

PCMC News – स्वीकृत दहा नगरसेवक निवडीचा विषय सत्ताधारी भाजपाकडून वेगवेगळ्या कारणांने लांबणीवर टाकला जात आहे. त्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने जून महिन्यातील सर्वसाधारण सभा होणार नाही. त्यामुळे स्वीकृत निवडीचा विषय थेट जुलै महिन्यातील सर्वसाधारण सभेसमोर येणार आहे. परिणामी, इच्छुक मंडळी आता हतलब झाली आहेत.
महापालिकेच्या ५ मे रोजीच्या तहकूब सर्वधारण सभेच्या विषयपत्रिकेवर स्वीकृत नगसेवकांची निवड हा पहिलाच विषय होता. एकमत न झाल्याने स्वीकृत नगरसेवकांची सात नावे सधार्यांकडून निश्चित करण्यात आलेली नाहीत. सत्ताधार्यांकडून तो विषय पुन्हा तहकूब करण्यात आला. त्यावर विरोधातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. तुमची नावे ठरत नसल्याने आमची तीन नावे का अडवता.
आमच्या तीन नावांना मंजुरी द्या, अशी आग्रही मागणी करत विरोधक महापौरांच्या आसनासमोर जमा होत घोषणाबाजी केली. मात्र, तो विषय तहकूब करण्यात आला. पुढील मे महिन्याच्या सभेऐवजी थेट १५ जूनच्या सभेपर्यंत तो विषय तहकूब करण्याची खेळी खेळण्यात आली. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता १८ मे रोजीपासून लागू झाली आहे.
ती आचारसंहिता २५ जूनपर्यत आहे. त्यामुळे १५ जूनची सर्वसाधारण सभा आयोजित करता येणार नाही. थेट १५ जुलैच्या सभेत स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय पटलावर येऊ शकतो. सत्ताधार्यांकडून स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय सातत्याने लांबणीवर टाकला जात असल्याने इच्छुक तसेच, विरोधातील राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त केला जात आहे.





