Vidhan Parishad election : विधानपरिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीचाही दावा; भाजपचा गेम बिघडवणार? उद्या होणार अंतिम फैसला
Vidhan Parishad election : पुण्याच्या विधानपरिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीचा जोरदार दावा; मंगळवारी राज्य पातळीवर होणार महायुतीचा अंतिम निर्णय.

Vidhan Parishad election – विधानपरिषदेच्या पुण्याच्या जागेवर भारतीय जनता पक्षापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही रविवारी दावा केला. यामुळे या जागेसाठी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस असून ही जागा कोण लढवणार याचा निर्णय मंगळवारी राज्यपातळीवर होणार आहे. पुण्याच्या जागेवर आमचा दावा कायम असून महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम, नगरसेवक राकेश कामठे उपस्थित होते. भाजपने मतदारांची दिलेली आकडेवारी चुकीची असून, आमचे संख्याबळ ३७१ असल्याचा दावा टिंगरे यांनी केला. आमच्याकडे १०-१२ जण इच्छुक आहे. या जागेसाठी भाजपने आग्रह करणे साहजिकच आहे. पुण्याचे नेतृत्व राष्ट्रवादीच करणार आहे. आमच्या पक्षात कोणतीही धुसफूस नाही, त्यामुळे कोणीही गैरसमजात राहू नये, असेही टिंगरे यांनी नमूद केले.
आमचे संख्याबळ ३७१
मतदारांची संख्या भाजपने ७९८ सांगितली असली तरी प्रत्यक्षात मतदारयादीनुसार मतदारांची संख्या ८६७ आहे. पंचायत समितीचे १३ पैकी १० सभापती आमच्या पक्षाचे आहेत. नगरपरिषद /नगरपंचायतीचे १८ पैकी ११ नगराध्यक्षही आमचे असून २७ स्वीकृत सदस्य आहेत. काँग्रेसची सदस्य संख्या भाजपने ४८ दाखवली असली तरी स्वीकृतसह त्यांच्याकडे २० सदस्य आहेत. अपक्षांसह मित्रपक्षही आमच्या पाठीशी आहेत.
स्वीकृतसह भाजप ७९८ मतदार असल्याचे सांगते. एकूण ८६७ सदस्यांपैकी ३७० सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून त्याखालोखाल भाजपा, इतरांचे सदस्य आहेत. ही जागा आमचीच असून अनाठायी वाद निर्माण करण्यासाठी जर कोणी या जागेवर दावा करत असेल, तर ते योग्य नाही. मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत समन्वयाची भूमिका घेतली आहे, असे टिंगरे म्हणाले.
यांच्या नावाची चर्चा
पुणे शहरातून सुनील टिंगरे, विक्रम काकडे, दीपक मानकर विधानपरिषदेच्या जागेसाठी इच्छुक आहेत. जिल्ह्यातून विलास लांडे, योगेश बहल, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, संदीप वाघेरे, सुरेश घुले, दिलीप मोहिते पाटील, रमेश थोरात इच्छुक असून त्यांच्या नावांचीही जोरदार चर्चा आहे.






