MLC Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील १६ जागांसाठी तसेच नागपूर मतदारसंघातील एका पोटनिवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी केली. या निवडणुकांची मतमोजणी २२ जूनला होणार आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारी अर्जांची छाननी २ जून रोजी होईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जून आहे. या मतदारसंघांत होणार निवडणूक – (MLC Election) ज्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे त्यामध्ये सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छ.संभाजीनगर-जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. या पैकी अनेक जागांची मुदत २०२२ मध्येच संपली होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने आणि आवश्यक निकष पूर्ण न झाल्याने या निवडणुका प्रलंबित राहिल्या होत्या. मुदत संपलेले सदस्य – (MLC Election) सोलापूरचे प्रशांत परिचारक आणि अहमदनगरचे अरुणकाका जगताप यांची सदस्यता जानेवारी २०२२ मध्ये संपली होती, तर ठाण्याचे रवींद्र फाटक जून २०२२ मध्ये निवृत्त झाले होते. डिसेंबर २०२२ मध्ये जळगावचे चंदुभाई पटेल, सांगली-साताराचे मोहनराव कदम, नांदेडचे अमरनाथ राजूरकर, यवतमाळचे दुश्यंत चतुर्वेदी, पुण्याचे अनिल भोसले आणि भंडारा-गोंदियाचे परिणय फुके यांची मुदत संपली होती. हेही वाचा – पुणे विभागाची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर; आचारसंहिता लागू तसेच रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गचे अनिकेत तटकरे, नाशिकचे नरेंद्र दराडे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीचे रामदास आंबटकर, अमरावतीचे प्रवीण पोटे, उस्मानाबाद-लातूर-बीडचे सुरेश धस आणि परभणी-हिंगोलीचे विप्लव बजोरिया हे जून २०२४ मध्ये निवृत्त झाले होते. छ.संभाजीनगर-जालन्याचे अंबादास दानवे यांची मुदत ऑगस्ट २०२५ मध्ये संपली. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक घेण्यासाठी संबंधित क्षेत्रातील किमान ७५ टक्के स्थानिक संस्था कार्यरत असणे आणि किमान ७५ टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असते. यापूर्वी हे निकष पूर्ण न झाल्याने निवडणुका घेता आल्या नव्हत्या. मात्र आता महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व १७ मतदारसंघांमध्ये आवश्यक निकष पूर्ण झाल्याची माहिती दिल्यानंतर आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.