Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरे यांचे पक्षांतर निश्चित; लवकरच अधिकृतरित्या करणार भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांचा भाजप प्रवेश अखेर निश्चित झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Prajakt Tanpure : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांचा भाजप प्रवेश अखेर निश्चित झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते आणि माजी राज्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे जवळपास स्पष्ट मानले जात आहे.
लवकरच अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. या राजकीय घडामोडींना आणखी वेग आला तो तनपुरे यांच्या सोशल मीडियावरील बदलामुळे.
त्यांनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर मामा जयंत पाटील यांचा फोटो लावत भावनिक संदेश पोस्ट केला. त्यामुळे त्यांच्या मनातील राजकीय द्वंद्व आणि राष्ट्रवादीशी असलेली भावनिक नाळ पुन्हा चर्चेत आली आहे.
तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी पोस्टमध्ये थेट पक्षांतराचा उल्लेख केला नसला, तरी राजकारणात निर्णय घ्यावे लागतात, पण काही नाती कायम मनात राहतात, अशा आशयाच्या भावनिक शब्दांनी अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
कार्यकर्त्यांमध्येही या पोस्टची जोरदार चर्चा सुरू असून, राष्ट्रवादीतील त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही तनपुरे यांच्या प्रवेशाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत किंवा प्रदेश भाजप कार्यालयात हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून तनपुरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि अखेर त्यांनी नवा राजकीय मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.





